Sunday, November 25, 2012

लग्न-२

[ लग्न-२ म्हटल्यावर  "दुसरं लग्नं वाटतं..हे..हे..हे.." असले चावट विचार तुमच्या मनात आले असतील ! पण तसं काही नसुन, ही पहिल्या लग्नाचीच दुसरी गोष्ट आहे. ऐतिहासिक संदर्भासाठी इच्छूकांनी येथे जावे.]

तर मागील लेखात सांगितल्या प्रमाणे अडचणींचे डोंगर पार करत बोहल्यावर चढण्याची संधी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली. रितीप्रमाणे साखरपुडाही झाला. साखरपुड्याच्या वेळेसच 'खरेदी' या प्रकारची लहानशी झलक पहायला मिळाली. तेव्हाच "हे काहीच नाही, लग्नाच्या वेळी बघ.." अशी टिप्पणी आजुबाजुच्या महिलामंडळानी केली. [आणि हे म्हणत असताना लवकरच एका जंगी खरेदीची संधी येणार आहे हा आनंद 
चेहेर्‍यावर ओसंडुन वहात होता ! ] त्यामुळे पुढे काय वाढुन ठेवलयं याचा अंदाज येईना.
साखरपुड्यानंतर 'आता सोन्याची खरेदी महत्वाची' हे मला पुन्हा पुन्हा ठासुन सांगण्यात आलं आणि दोन्हीकडच्या बायका त्या नियोजनाला लागल्या.सखोल चौकशी केली असता या खरेदीत आपल्या हाती काहीच लागत नाही, सर्व खरेदी ही होणार्‍या बायकोची (हो.बा.) असते, असं लक्षात आल्यावर माझा अर्धा उत्साह मावळला.पण जाणं भाग होतं. एका रविवारी या खरेदीचा मुहुर्त निघाला. त्यावेळी "मग कुठे जायचयं सोनेखरेदीला ? " असा बाळबोध प्रश्न मी विचारल्यावर आजुबाजुच्या लोकांनी कीव, आश्चर्य, कुत्सितपणा अशा अनेक भावनांनी माझ्याकडे पाहिलं. नंतर कोणितरी दया येऊन "अरे सोनं म्हणजे गाडगीळांच्याकडे" असं सांगितलं. त्यामुळे "पुण्यातले बाकीचे सराफ सोनं सोडुन दगडमाती विकतात का?" , "जायचचं असेल तर कोथरुड मधलं गाडगीळांचं दुकान सोडुन लक्ष्मीरोडवर कशाला जायला पाहिजे ?" असले प्रश्न मी जीभेच्या टोकावरुन मागे ढकलले.
तर सकाळी १० वाजता गाडगीळांच्या लक्ष्मीरोडवरच्या दुकानासमोर भेटायच असं दोन्हीबाजुंकडील लोकांचं ठरलं. आता दुकान १०:३० उघडत असताना १० पासुन जाउन काय करायचं ? याचा उलगडा होईना.  पण 'जे जे होईलं  ते ते पहावे' या संतविचारांचा आधार घेऊन गप्प बसलो.ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता दोन्हीकडची मंडळी इष्टस्थळी पोचली. यासाठी रविवारी सकाळी भल्या पहाटे ९ वाजता उठायला लागुन, चहा-पेपर या अत्यावश्यक आणि आनंददायी गोष्टींवर बंधने आल्याने मी आधीच वैतागलो होतो.तिथे पोचुन बघातो तर आमच्यासारखे अनेक लोक, गॅसच्या दुकानाबाहेर गर्दी असते, तसे त्या दुकानाबाहेर तिष्ठत उभे होते. आता पुणेरी माणुस रांग लावण्यात स्वतःचा अपमान समजतो, त्यामुळे रांग वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. बरोब्बर १०:३० वाजता दुकानाच शटर वर होताच, यष्टी फलाटावर लागल्यावर पब्लिक जसं आत घुसतं तशा पध्दतीनी लोकं आत घुसली. त्यामुळे मुंबईच्या लोकल मधे आपण जसे काही न करता चढुउतरु शकतो, त्याप्रमाणे मी आपोआप आत ढकलला गेलो. मागुन कुठुनतरी खोलवर आईचा आवज आला.."नेकलेस..नेकलेस counter ला जा..". आता हे काही मी लहानपणापासुन जात असलेल वाण्याचं दुकान नाही. त्यामुळे मला कसं कळणार  नेकलेस counter कुठे ते ? पण तेवढ्यात दुर कोपर्‍यात भिंतीवर लटकवलेले नेकलेस दिसले आणि नशिबावर भरोसा ठेऊन मी त्या दिशेनी सरकु लागलो. यथावकाश तिथे पोचल्यावर बघतो तर हो.बा. (होणारी बायको !), सासु-सासरे आधीच पोचले होते. हो.बा. नी  तर सराईतपणे counter वर जागाही पटकावली होती.त्यानंतर "अरे जा जा पुढे..आता तुम्हीच select करा..आमचं काय...आमचा झाला संसार.." अश्या टिप्पण्या ऐकत त्या counter च्या गर्दीत घुसलो. मला एक पाऊल आणि मुंडक आत घालण्याइतपत जागा मिळाली. 'मुंडक आत गर्दीत आणि बाकीचा देह बाहेर' हे कसं दिसत असेल अश्या संकोचानी मी आत शिरलो पण असे अनेक देह त्या गर्दीतुन बाहेर आले होते. साधारणपणे भाजी मंडई सारखं वातवरण होत. लोकं टाचा उंचावुन, उड्या मारुन counter बघत होती. मंडईतल्या कांदे-बटाट्यांसारखं सोनं विकलं जात होत. तिकडे बाबांनी आणि सासर्‍यांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवावरुन एक मोकळा बाक पटकावला.

गाडगीळांकडचे काही विक्रेतेही नामी आहेत. आमच्या विक्रेता शुध्द मराठी बोलणारा होता. "उकडतयं हो.." असं म्हटल्यावर "वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे" (चालु करण्याबद्दल अवाक्षर नाही, तुमची पुर्वपुण्याई जबर असेल तर होइल चालु ही वृत्ती !), "उद्या दुकान चालु आहे का ?" यावर "उद्या साप्ताहिक सुट्टी आहे" अशी परिस्थिती होती. त्यानंतर अनेक नेकलेस बघुनही काही घडेना. 'फारच गॉडी आहे..', 'फारच साधा आहे..', 'खुपच जड आहे..', 'फारच नाजुक आहे..तुटनार नाही ना लगेच..', 'एवढीच व्हरायटी आहे ? मागच्या वेळेला आले होते तर बरेच दिसले होते..'  अशी विघ्न येत होती. या सगळ्या comments  ऐकुनही तो मात्र plastic च्या फुटपट्ट्या विकाव्यात इतक्या निर्विकारपणे दागिने दाखवत होता. आता इतका वेळ झाला तरी कोंडी फुटेना हे बघितल्यावर मी, 'समोर रांकाकडे बघायचं का वेगळी  व्हरायटी आहे का ते ?' असा क्षीण प्रयत्न केला. त्यावर जणु काही मी एखाद्या स्मगलर कडुन सोनं घेऊयात  का असं सुचवतोय असे चेहेरे आजुअबाजुच्या जनसमुदायानी केले. ("काहीही काय ....." . याला इंग्रजी मधे 'Cult following' असा सुंदर शब्द आहे !) त्यामुळे आता आपलं जे काही व्हायचं ते गाडगीळांच्या चरणी होणार हे लक्षात आलं. मान आणि पाऊलं आता अवघडली होती. हा कारावास आता कधी संपणार या चिंतेने मी 'हा नेकलेस फारच' छान आहे', 'हा तुला शोभुन दिसेल' असे प्रयत्न करत होतो. शेवटी दैवयोगाने एक नेकलेस सेट पसंत पडला. तो घालुन बघण्यात आला. 'खुपच छान', 'अग्गदी वेगळा आहे..', 'तुला शोभुन दिसतोय.. ' अश्या सर्व पावत्या घेतल्यावर मंडळी मंगळसुत्राकडे वळली.

मंगळसुत्रं वरच्या दालनात होती. तिथे पोचल्यावर कळलं की इथे देशोदेशीच्या मंगळसुत्रांचा महोत्सव चालु आहे. इथेही बाबांनी आणि सासर्‍यानी चपळाईनी रिकामा बाक पटकावला आणि "अहो, पाकिस्तानचं आहे का हो मंगळसुत्र..", "दहा मिनिटात select  केलं तर गाडगीळ १०% discount देतात" अश्या comments सुरु केल्या. इथेही परत मागचीच कहाणी सुरु झाली. यावेळी मला मान आणि पाऊलाबरोबर एक हात ठेवायलाही जागा मिळाली होती. बर्‍याच वेळानी, "यात काहीच काळे मणी नाहीयेत..", "कसलं जड आहे.. ", "हे काय मंगळसुत्र वाटतयं का ? वाट्यांचच दाखवा..", "सगळे काळे मणीच दिसतायत.." अश्या अनेक संवादांनंतर, सोनं आणि काळे मणी यांच गुणोत्तर जमुन मंगळसुत्र खरेदी संपली.आता मात्र माझा संयम संपला. सकाळी चहा, पॅटिस, इडली-सांबार असा किरकोळ नाष्टा केल्याने भुकेचा आगडोंब उसळला होता. त्यामुळे अन्न मिळाल्याशिवाय पुढे जाणे नाही असा पवित्रा मी घेतला. त्यावर समस्त महिलावर्गानी लगेच सहमती दर्शवली.त्यामुळे आता खरेदी संपली आणि जेऊन दुपारच २-३ तास लवंडता येईल या आनंदात काही क्षण जातात न जातात तोच, "चालेल..आता जेऊयात..पाटल्या-बांगड्यांच जेवणानंतर बघु" हे सासुबाईंच वाक्य आलं. ते ऐकताच आज दुपारचं जागरण होणार हे लक्षात आलं. (मी सांगतो तुम्हाला...दुपारचं जागरणं प्रकृतीला वाईट..त्यातुन शनि-रविवारचं तर फारच वाईट..). मग जेवण, पाटल्या-बांगड्यांची खरेदी संपवुन, गाडगीळांवरुन खुप पैसे ओवाळुन टाकुन घरी यायला रात्र झाली. अश्या प्रकारे 'लग्नची खरेदी' या प्रकाराशी माझा पहिला 'encounter' झाला ! पण हे काहीच नाही अशी साड्यांची खरेदी बाकी होती.
  
साखरपुड्याच्या एकाच साडीच्या खरेदीने माझा चिमुकला मेंदु freeze  झाल्यामुळे, मी 'साडी' या वस्तुच्या वाटेला जाणार नाही ही प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे साडी खरेदीचा विषय निघताच, "साडी खरेदीला मी कशाला ? मला काय कळतयं त्यातलं ? तु जाऊन ये  बाकीच्यांबरोबर.." असं सुचवल्यावर, (डोळे मोठे करुन), "आपल्या लग्नाची साडी घ्यायला मी एकटीच जाऊ ??" असा प्रश्न वजा फटकारा आला. आता, "तु एकटी कशी ? तुझी आई, माझी आई, तुझी काकु, मामी पण असणार, साडी आपल्या लग्नाची असली तरी तु नेसणार आहेस, आणि मला सर्वच साड्या सारख्याच बर्‍यावाईट वाटतात" असं म्हणावसं वाटलं. पण लॉजिक, बायको आणि साडीखरेदी या गोष्टी एकत्र जात नाहीत. असं बोलल्यास वातावरणाचं तापमान वाढतं, चेहेर्‍याचा रंग बदलतो, आवाजाची पट्टी आणि धार चढते आणि ठिणगीचा वणवा होऊ शकतो असा पुर्वानुभव असल्याने गप्प बसलो.

शेवटी एका रविवारी तो प्रसंग आलाच. अनुभवी खेळाडु, (बाबा आणि सासरे !) घरीच राहिले. लक्ष्मीरोडवरच्या एका दुकानातल्या एका विक्रेत्यापुढे जाऊन बसलो. तो एका मागुन एक अश्या साड्या उलगडत होता आणि समस्त महिलावर्ग चेहेर्‍यावरची माशीही हलु न देता समोर बसला होता.

"ऊं हुं.."
"ही नको.."
"असली नको.."
"छे ही तर नकोच.."
"काहीतरीच रंग आहे.."
"जरा तरुण मुलींच्यादृष्टीनी दाखवा हो.."
"नविन माल नहिये का ?"
"फ्रेश नाही वाटते पीस.."
"जरा वर्क वाली दाखवा.."
"फारच वर्क आहे.."
"या design च्या बुट्ट्या फारच मोठ्या मोठ्या आहेत.."
अश्या आणि इतर अनेक कारणांमुळे साड्या reject  होत होत्या.या दुकानातुन त्या दुकानात भटकंती चालु होती. मी नंतर विचार करणचं बंद केलं.नंतर नंतर तर एखद्या विक्रेत्यानी मोठ्या मोठ्या बुट्ट्यांची किंवा नकोश्या रंगाची साडी काढल्यावर मीच नर्व्हस व्ह्यायचो की आता या बायका नाकं मुरडणार.शेवटी 'Exclusive' वाल्या कासटांकडे मंडळी स्थिरावली. काही साड्या बघुन डोळे लकाकले. एखाद-दुसरी साडी 'ड्रेप' झाली. शेवटी स्वतः मालक , कासट, मैदानात उतरले. अनेक तासांनंतर सर्व साड्या कासटांकडे मिळाल्या.मला परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार झाला.कासट विजयी झाले.या अनुभवावरुन, ज्या दुकानात विक्रेता अतिशात सहनशील असतो, अनेक साड्या उलगडुनही  "याच रंगाची पटोला आहे का हो ?" या प्रश्नाला "आहे की..काढतो..गणु...रेड मधे पटोला घे.." (मग प्रत्यक्षात असो वा नसो !) हे उत्तर देऊ शकतो, तिथेच साडी विकली जाते, असं माझं मतं झालं आहे.
या मुख्य खरेदीशिवाय बाकी खरेद्या चालुच होत्या.

"मला किनई एक पर्स घ्यायचीय.."
"का का पण का ?? तुझ्याकडे २-३ मोठ्या  पर्स आहेत,५-६ छोट्या पर्सेस तुझ्या खोलीत इकडे तिकडे पसरलेल्या मी स्वतः पहिल्यात..१-२ तर माझ्याच समोर लोकांनी भेट दिल्या.. "
"हो...पण त्यातली कुठलीच 'functional use"  ची नाहिये.."
"............................."

"मला किनई १-२ साड्या घ्यायच्यात.."
"का का पण का ?? तुझ्याकडे already  कपाटभर साड्या आहेत, ५-६ तु आईच्या मारलेल्या आहेस, डझनभर लग्नासाठी घेतल्या..."
"पण त्या सगळ्या खुप भारी आहेत..१-२ अश्याच साध्या function साठी हव्यात नं.. "
"............................"

"मला किनई २-३ चांगल्यापैकी ड्रेस घ्यायचेत.."
 "का का पण का ?"  (आता काय तेच तेच लिहायच भाऊ..घ्या समजुन..)
"पण 'casual ware' ला असे चांगले नाहीयेत."
"............................"

'Functional ware', 'Casual Ware', 'Party ware', 'असेच ware', 'रोजच्यासाठी ware', 'office ware', हे सगळं मानवी बुध्दिमत्तेपलीकडचं आहे असं आताशा वाटायला लागलयं.
आता कळतं रामदास स्वामी लग्नातुन का पळाले ! असं काहीसं घडलं असेल..त्या लग्नतयारीनी, न संपणार्‍या खरेदीनी कंटाळुन बोहल्यावर उभं राहिल्यावर ऐत्यावेळी त्या भटजींना आपली गायकी दाखवायची हुक्की आली असेल.त्यावर वैतागुन "अहो गुरुजी, फार कंटाळलोय हो या लग्न तयारीला ,खरेदीला, आटपा लवकर.. " असं म्हटल्यावर गुरुजी म्हणाले असतील, "अहो रामभाऊ, घ्या सवय करुन ..सगळा संसार करायचाय इथुन पुढे तुम्हाला !" यावर वास्तवाची जाणीव होऊन ते पळाले असतील. रामदासांच सोडा हो. ते आपल्या सारखेच मानव होते. पण भगवान श्रीकृष्णानीही १४००० बायका केल्या आणी मग गीता सांगितली  "कर्म्ण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनं" ! देवाधिदेवाची ही अवस्था तर त्यापुढे आपली काय कथा ! (पण श्रीकृष्णाला १४००० सांभाळाव्या लागल्या..आपली एकच आहे...तेवढी जमेल अशी आशा करायला हरकत नाही, काय ? )

Thursday, January 5, 2012

कुत्रा-२

कुत्रा-२

(विशेष सुचना - आपण जर श्वानप्रेमी असाल तर आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. पण आजकाल कोणी बालवाडीतल्या मुलाचा गालगुच्चा घेऊन जरी त्याला विचारलं "बाळ, कोणत्या शाळेत जातोस रे?" तरी त्याच्या भावना दुखावण्याची शक्यता असते. तात्पर्य, आम्ही हल्ली दुसर्‍यांच्या भावनांची जबाबदारी घेत नाही.)

कुत्रा-२ अशी headline असेल तर पहिला भाग असणारच हे तुमच्यासारख्या लहानपणापासुन हुशार असणार्‍या चाणाक्ष वाचकांनी ओळखल असेलच. तर तुच्याकडील फालतु वेळ सत्कारणी लावण्यासाठी वाचा..कुत्रा. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की तो लेख वाचल्याशिवाय हा कळणार नाही आणी त्या पहिल्या भागाचा या भागाशी संबंध आहे, तर तुम्ही चुक आहात. या भागाचा त्या भागाशीच काय, पण मागच्या वाक्याचा पुढच्या वाक्याशी संबंध असेलच याची खात्री आम्ही देऊ शकत नाही.

तर सांगायचा मुद्दा असा की गेल्या काही वर्षापासुन आमच्या group मधे लग्नाचा मौसम आहे. (आता यात कुत्र्याचा संबंध कुठे आला ? असा प्रश्न जर तुमच्या डोक्यात वळवळत असेल, तर तुम्ही एकंदरीतच या गोष्टीचा फार विचार करत आहात ! Take it easy बाप्पा...). लफडी करुन, बघुन दाखवुन, लोक लग्नं करत आहेत. लग्न झालेली मंडळी लग्न न झालेल्यांना, लग्न ही काय चीज आहे, बायको ही काय वस्तु आहे, याच्या सुरस आणी चमत्कारीक हकीकती सांगत आहेत. त्यामुळे जसं नारळ कसा निघेल हे फोडल्याशिवाय सांगता येत नाही, तशी बायको कशी निघेल ते सांगण कठीण आहे, असाच एकंदरीत जनमताचा कौल आहे. ('ह्या मुलीनी लग्नानंतर सरड्यासारखे रंग बदलले रे...' असही एक टोकाचं मत आहे.) पण आमच्या मित्रमंडळींनी ठणठण वाजवुन घेतल्यामुळे आतापर्यत तरी सगळे नारळ तसे बरे निघालेत. आता सगळ्याच कथा मनोरंजक असल्या तरी स्थळकाळाच भान ठेऊन मुद्द्याची गोष्ट सांगतो.

बघुन केलेल्या लग्नात ज्या अनेक गोष्टींची चर्चा लग्न ठरवण्याआधी करावी लागते त्यात 'मुलीचे पाळीव प्राण्यावरील प्रेम' हा मुद्दा निसटला तर कोणत्या गोष्टींना तोंड द्याव लागतं याच हे उत्तम उदाहरण आहे. तर आमच्या या मित्राला लग्न ठरल्यावर काही दिवसातच बायकोचा माहेरी एक अतिशय लाडका कुत्रा असुन तो तिचा जीव की प्राण आहे अस कळल. आता आमचा हा मित्र पडला आमच्या सारखा श्वानव्देष्टा. रस्त्यावरुन चालताना कुत्र आडवं आल तर आम्ही बाजु, गल्ली, रस्ता जे जमेल ते बदलतो. बायकोच्या या श्वानप्रेमाची सुरवातीला नीटशी कल्पना न आल्याने, त्या कुत्राची थट्टा करणे, एकंदरीतच श्वानजमाती बद्दल अनुद्गार काढणे, तिच्या बरोबर असताना रस्त्यावरच्या कुत्रांना दगडं मारणे असले उद्योग यानी केले. शेवटी एकदा भर रस्त्यात कुत्राच्या अंगावर bike नेल्यासारखी केल्यावर, तिनी भर चौकात bike थांबवुन, याचे परिणाम फार वाईट होतील असा आणीबाणीचा इशारा दिल्यावरच हा भानावर आला. पण याच्या मागची श्वानपीडा संपेना. बायको श्वानओढीने वरचेवर माहेरी गेल्यावर, ह्याचं तिकडे जाण आलच. पण तिथे हे कुत्र bedroom मधे बागडुन याच्या एकांतवासाची राखरांगोळी करु लागल. 'ह्याला आपण थोड्यावेळ gallery त ठेऊ या का?' असं अत्यंत लीनेतेनी विचारल्यावर, 'त्यापेक्षा तुच का जात नाहीस gallery मधे' हे उत्तर आलं. वर 'हा फक्त एक कुत्रा नसुन तुझ्यासारखा घरातील एक सदस्य आहे' हे ही ऐकाव लागलं. तर त्या कुत्र्यापायी पावला पावला वर अपमान सहन करणार्‍या आमच्या मित्राला आम्ही अनेक वेळा अश्रुपातासाठी खांदा दिला आहे.

तर हे सगळ आज आठवण्याच कारण असं की ऑफिसमधे नेहेमीच चार अंकी नाटक संपवुन घरी आलो होतो. ( म्हणजे PM च्या शिव्या खाणे, आम्ही वेठबिगारी कामगार असल्यागत ऑर्डरी सोडणार्‍या client ला, हे जमणार नाही, हे करायला वेळ नाही, एवढ्या पैशात सगळं software नाही तर त्याचं एकच page मिळेल अशी उत्तर देणे वगैरे वगैरे..) जेवण करुन TV समोर पाय तणावुन बसलो होतो. समोर IBN वर वागळेकाका शिरा ताणताणुन कोणावर तरी करवादत होते. दुसर्‍या channel वर मातॄभाषेतील कोणतीतरी भयावह serial चालु होती. सासु सुनेला विष देऊन मारायचा कट करत होती. ते क्षणभरही पाहुन मानसिक त्रास झाल्यामुळे, 'मराठी serial च्या दगडापेक्षा वागळे ची वीट मऊ' अस विचार करुन परत IBN कडे channel सर्फत सर्फत जात असताना एके ठिकाणी कुठल्याश्या शहरात फक्त कुत्रांसाठी असणार कपड्याच दुकान बघितल. ते बघताच आमचा मित्र, त्याची श्वानपीडा आणी बायकोच्या कुत्र्याला गोणत्यात घालुन लांब सोडुन येण्याची त्याची फक्त कल्पनेतच असलेली इच्छा हे सगळ आठवलं.

आता दुसरे काहीच कामधंदे नसल्यामुळे आणी मित्रांच्या कल्पना रबरासारख्या ताणुन ताणुन मोठ्या करण्याची जन्मजात खोड असल्यामुळे 'जर आमच्या मित्राच्या बायकोच्या माहेरील श्वानाला अचानक जुलाब सुरु झाले' तर ही बातमी IBN चा वागळे कसा रवंथ करेल या कल्पनेचा जन्म झाला...

(थट्टेच्या सोयीसाठी आपण मित्राचं आडनाव गोडतोंडे आहे अस धरुयात.)

वागळे - Prime Time मधे आपल स्वागत असो. आजची सर्वात मोठी खबर आहे, गोडतोंड्यांच्या कुत्र्याला आज अचानक जुलाब सुरु झालेले आहेत. आज सकाळी ८ वाजुन ११ मिनिटानी आणी १० वाजुन १३ मिनिटानी असे दोन जुलाब झालेले आहेत. आमचा correspondent सकाळपासुन त्यावर लक्ष ठेवुन आहे. आपण जाऊ या त्याच्याकडे. प्रशांत, काय सांगशील ?काय परिस्थिती आहे ? नेमक काय घडतयं ? ( जुलाब ..अजुन काय ?!!...पण असं एका शब्दात उत्तर दिलं तर TRP जातो!)

प्रशांत - होय निखिल सर, आज सकाळ पासुनच गोडतोंड्यांच्या कुत्र्याला जुलाब सुरु झालेत. साधारण दीड तासाच्या अंतरानी दोन जुलाब झालेत. त्यामुळे सगळेच चिंतेत आहेत.अचानक सुरु झालेल्या या जुलाबांचं कारण कोणालाच कळत नाहिये. अफवांना ऊत आलाय. एकंदरीत गोंधळाची परिस्थिती आहे. निखिल सर,

वागळे - आपण पाहिलतं त्याप्रमाणे परिस्थिती गंभीर आहे. तु लक्ष ठेवुन रहा. पुढचा जुलाब झाल कि लगेच खबर दे. तो पर्यंत याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा सवाल बघा पडद्यावर, 'गोडतोंड्यांच्या कुत्र्याच्या जुलाबामागे काही कारस्थान आहे का ?' ७०% लोकं 'होय' म्हणतायातं...आपण चर्चेला सुरवात करुयात. आपल्या सोबत आहेत मिसेस गोडतोंडे, मिस्टर गोडतोंडे, building चे secretory, प्रसिध्द पशुरोगतज्ञ आणी animal rights society च्या अध्यक्षा.

वागळे - मी मिसेस गोडतोंडेंना विचारतो, तुमच्या कुत्र्याला सकाळपासुन जुलाब होतायत, काय सांगाल तुम्ही ?कशामुळे होतयत हे जुलाब ?काय कारण आहे ?

मिसेस गोडतोंडे - हे सगळं building मधल्या अस्वच्छतेमुळे होतय...कचरा उचलला जात नाही...टाक्या गळतायत...पाईप फुटलेत...आज माझ्या टॉमीला जुलाब होतायत, उद्या सगळ्यांना होतील...सेक्रेटरी दिवसभर घरात असुनही काही कामं करत नाहीत...

वागळे - एक मिनिट थांबा...मला सेक्रेटरींना विचारु द्या..फार गंभीर आरोप अहेत हे...सेक्रेटरी उत्तर द्या...building मधल्या घाणीचा परिणाम आहे हा, तुम्ही कामचुकार आहात असं म्हणतायत त्या..

सेक्रेटरी - सर्वप्रथम मी हे नमुद करु इच्छितो की गोडतोंड्यांच्या कुत्र्याला होणारे जुलाब ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याला लवकरच आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कदाचीत मिसेस गोडतोंडेंना हे माहित नसेल, आमच्या committee नी building मधे या वर्षी बर्‍याच सुधारणा केल्या. parking च्या डाव्या कोपर्‍यातल्या पानाच्या पिचकारीवर रंग मारणे, watchman ला जुन्या कपड्यांचे वाटप, भव्य गणपती उत्सव...

वागळे - पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत...जुलाबांचं काय ?

सेक्रेटरी - हो...मी येतोच आहे गोडतोंडेंच्या जुलाबाकडे..(जीभ चाऊन)..त्यांच्या कुत्र्याच्या जुलाबांकडे. माझ्या मते गोडतोंड्यांनी अतिरिक्त श्वानप्रेमामुळे त्याला अतिरिक्त खाऊ घातल्याचा परिणाम म्हणुन हे जुलाब होतायतं असं माझ स्पष्ट मत आहे.

वागळे - अतिरिक्त खाऊ घातल्यामुळे हे झालयं असं म्हणतायत सेक्रेटरी..आपण जाऊ या पशुवैद्यकीय तज्ञांकडे...ते फोनवरुन आपल्याबरोबर आहेत...डॉक्टरसाहेब काय सांगाल तुम्ही ?

श्वानप्रेमाचा अतिरेकामुळे हे होतय असं म्हटल जातयं.. किती तथ्य आहे याच्यात ?

डॉक्टर - Helo..Helo

वागळे - डॉक्टर, तुम्हाला माझं बोलणं ऐकु येतयं ?

डॉक्टर - हा...हा... कोनला जुलाब होताये म्ह्नले ?...कुत्र्याला ?अवो आम्ही मोठ्या गुरांचे डॉक्टर हावोत...म्ह्स रेड्याखाली आपण काय बघत नाय..या वेळचं तरास देऊ नका फोन करुन..रातीचं काड्या सारत बसलय लोकांच्यात तिज्या आ..

वागळे - (चेहर्‍यावरचे भाव न बदलण्याचा प्रयत्न करत..) आपला संपर्क तुटलाय डॉक्टरांशी..आपण animal rights च्या अध्यक्षांकडे जाऊ या...मॅडम, ही सगळी चर्चा तुम्ही बघताय..काय सांगाल ?

अधक्षा - सगळ्यात आधी आपण मुळ मुद्दा लक्षात घेतला पाहिजे...जुलाब हे लक्षण आहे...मिसेस गोडतोंड्यांनी कुत्र्यावरचं आपलं अवाजवी लक्ष कमी केलं पाहिजे...त्याला रोज फिरायला नेलं पाहिजे...त्यामुळे त्याची पचनक्रिया सुधारुन जुलाब थांबतील. मुक्या प्राण्याना बोलता येत नाही हे आपण समजुन घेतलं पाहिजे ..(!!??)

वागळे - आपला वेळ संपलाय.....पुन्हा एकदा पडद्यावर पहा, काय म्हणतायत लोकं...आता फक्त १०% लोकं म्हणतायत की जुलाबांमागे कारस्थान होतं..या चर्चेनंतर मिसेस गोडतोंडे कुत्र्यावरचं लक्षा कमी करुन घरात लक्ष वाढवतील अशी आशा करुयात. धन्यवाद.

( ही सर्व चर्चा हताशपणे पहात असलेला आणी बोलण्याची एकही संधी न मिळालेला आमचा मित्र (तशीही त्याला लग्नानंतर बोलायची फारशी संधी एकंदरितच मिळत नाही..) रात्री कट्ट्यावर हळु आवाजात हताशपणे बोलत होता...च्यायला, सालं कुत्रं आहे की सैतान...उंदराच्या गोळ्या चारुन सुध्दा फक्त जुलाबच ??)