Sunday, November 25, 2012

लग्न-२

[ लग्न-२ म्हटल्यावर  "दुसरं लग्नं वाटतं..हे..हे..हे.." असले चावट विचार तुमच्या मनात आले असतील ! पण तसं काही नसुन, ही पहिल्या लग्नाचीच दुसरी गोष्ट आहे. ऐतिहासिक संदर्भासाठी इच्छूकांनी येथे जावे.]

तर मागील लेखात सांगितल्या प्रमाणे अडचणींचे डोंगर पार करत बोहल्यावर चढण्याची संधी मिळेल अशी शक्यता निर्माण झाली. रितीप्रमाणे साखरपुडाही झाला. साखरपुड्याच्या वेळेसच 'खरेदी' या प्रकारची लहानशी झलक पहायला मिळाली. तेव्हाच "हे काहीच नाही, लग्नाच्या वेळी बघ.." अशी टिप्पणी आजुबाजुच्या महिलामंडळानी केली. [आणि हे म्हणत असताना लवकरच एका जंगी खरेदीची संधी येणार आहे हा आनंद 
चेहेर्‍यावर ओसंडुन वहात होता ! ] त्यामुळे पुढे काय वाढुन ठेवलयं याचा अंदाज येईना.
साखरपुड्यानंतर 'आता सोन्याची खरेदी महत्वाची' हे मला पुन्हा पुन्हा ठासुन सांगण्यात आलं आणि दोन्हीकडच्या बायका त्या नियोजनाला लागल्या.सखोल चौकशी केली असता या खरेदीत आपल्या हाती काहीच लागत नाही, सर्व खरेदी ही होणार्‍या बायकोची (हो.बा.) असते, असं लक्षात आल्यावर माझा अर्धा उत्साह मावळला.पण जाणं भाग होतं. एका रविवारी या खरेदीचा मुहुर्त निघाला. त्यावेळी "मग कुठे जायचयं सोनेखरेदीला ? " असा बाळबोध प्रश्न मी विचारल्यावर आजुबाजुच्या लोकांनी कीव, आश्चर्य, कुत्सितपणा अशा अनेक भावनांनी माझ्याकडे पाहिलं. नंतर कोणितरी दया येऊन "अरे सोनं म्हणजे गाडगीळांच्याकडे" असं सांगितलं. त्यामुळे "पुण्यातले बाकीचे सराफ सोनं सोडुन दगडमाती विकतात का?" , "जायचचं असेल तर कोथरुड मधलं गाडगीळांचं दुकान सोडुन लक्ष्मीरोडवर कशाला जायला पाहिजे ?" असले प्रश्न मी जीभेच्या टोकावरुन मागे ढकलले.
तर सकाळी १० वाजता गाडगीळांच्या लक्ष्मीरोडवरच्या दुकानासमोर भेटायच असं दोन्हीबाजुंकडील लोकांचं ठरलं. आता दुकान १०:३० उघडत असताना १० पासुन जाउन काय करायचं ? याचा उलगडा होईना.  पण 'जे जे होईलं  ते ते पहावे' या संतविचारांचा आधार घेऊन गप्प बसलो.ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता दोन्हीकडची मंडळी इष्टस्थळी पोचली. यासाठी रविवारी सकाळी भल्या पहाटे ९ वाजता उठायला लागुन, चहा-पेपर या अत्यावश्यक आणि आनंददायी गोष्टींवर बंधने आल्याने मी आधीच वैतागलो होतो.तिथे पोचुन बघातो तर आमच्यासारखे अनेक लोक, गॅसच्या दुकानाबाहेर गर्दी असते, तसे त्या दुकानाबाहेर तिष्ठत उभे होते. आता पुणेरी माणुस रांग लावण्यात स्वतःचा अपमान समजतो, त्यामुळे रांग वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता. बरोब्बर १०:३० वाजता दुकानाच शटर वर होताच, यष्टी फलाटावर लागल्यावर पब्लिक जसं आत घुसतं तशा पध्दतीनी लोकं आत घुसली. त्यामुळे मुंबईच्या लोकल मधे आपण जसे काही न करता चढुउतरु शकतो, त्याप्रमाणे मी आपोआप आत ढकलला गेलो. मागुन कुठुनतरी खोलवर आईचा आवज आला.."नेकलेस..नेकलेस counter ला जा..". आता हे काही मी लहानपणापासुन जात असलेल वाण्याचं दुकान नाही. त्यामुळे मला कसं कळणार  नेकलेस counter कुठे ते ? पण तेवढ्यात दुर कोपर्‍यात भिंतीवर लटकवलेले नेकलेस दिसले आणि नशिबावर भरोसा ठेऊन मी त्या दिशेनी सरकु लागलो. यथावकाश तिथे पोचल्यावर बघतो तर हो.बा. (होणारी बायको !), सासु-सासरे आधीच पोचले होते. हो.बा. नी  तर सराईतपणे counter वर जागाही पटकावली होती.त्यानंतर "अरे जा जा पुढे..आता तुम्हीच select करा..आमचं काय...आमचा झाला संसार.." अश्या टिप्पण्या ऐकत त्या counter च्या गर्दीत घुसलो. मला एक पाऊल आणि मुंडक आत घालण्याइतपत जागा मिळाली. 'मुंडक आत गर्दीत आणि बाकीचा देह बाहेर' हे कसं दिसत असेल अश्या संकोचानी मी आत शिरलो पण असे अनेक देह त्या गर्दीतुन बाहेर आले होते. साधारणपणे भाजी मंडई सारखं वातवरण होत. लोकं टाचा उंचावुन, उड्या मारुन counter बघत होती. मंडईतल्या कांदे-बटाट्यांसारखं सोनं विकलं जात होत. तिकडे बाबांनी आणि सासर्‍यांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवावरुन एक मोकळा बाक पटकावला.

गाडगीळांकडचे काही विक्रेतेही नामी आहेत. आमच्या विक्रेता शुध्द मराठी बोलणारा होता. "उकडतयं हो.." असं म्हटल्यावर "वातानुकुलीत यंत्रणा बंद आहे" (चालु करण्याबद्दल अवाक्षर नाही, तुमची पुर्वपुण्याई जबर असेल तर होइल चालु ही वृत्ती !), "उद्या दुकान चालु आहे का ?" यावर "उद्या साप्ताहिक सुट्टी आहे" अशी परिस्थिती होती. त्यानंतर अनेक नेकलेस बघुनही काही घडेना. 'फारच गॉडी आहे..', 'फारच साधा आहे..', 'खुपच जड आहे..', 'फारच नाजुक आहे..तुटनार नाही ना लगेच..', 'एवढीच व्हरायटी आहे ? मागच्या वेळेला आले होते तर बरेच दिसले होते..'  अशी विघ्न येत होती. या सगळ्या comments  ऐकुनही तो मात्र plastic च्या फुटपट्ट्या विकाव्यात इतक्या निर्विकारपणे दागिने दाखवत होता. आता इतका वेळ झाला तरी कोंडी फुटेना हे बघितल्यावर मी, 'समोर रांकाकडे बघायचं का वेगळी  व्हरायटी आहे का ते ?' असा क्षीण प्रयत्न केला. त्यावर जणु काही मी एखाद्या स्मगलर कडुन सोनं घेऊयात  का असं सुचवतोय असे चेहेरे आजुअबाजुच्या जनसमुदायानी केले. ("काहीही काय ....." . याला इंग्रजी मधे 'Cult following' असा सुंदर शब्द आहे !) त्यामुळे आता आपलं जे काही व्हायचं ते गाडगीळांच्या चरणी होणार हे लक्षात आलं. मान आणि पाऊलं आता अवघडली होती. हा कारावास आता कधी संपणार या चिंतेने मी 'हा नेकलेस फारच' छान आहे', 'हा तुला शोभुन दिसेल' असे प्रयत्न करत होतो. शेवटी दैवयोगाने एक नेकलेस सेट पसंत पडला. तो घालुन बघण्यात आला. 'खुपच छान', 'अग्गदी वेगळा आहे..', 'तुला शोभुन दिसतोय.. ' अश्या सर्व पावत्या घेतल्यावर मंडळी मंगळसुत्राकडे वळली.

मंगळसुत्रं वरच्या दालनात होती. तिथे पोचल्यावर कळलं की इथे देशोदेशीच्या मंगळसुत्रांचा महोत्सव चालु आहे. इथेही बाबांनी आणि सासर्‍यानी चपळाईनी रिकामा बाक पटकावला आणि "अहो, पाकिस्तानचं आहे का हो मंगळसुत्र..", "दहा मिनिटात select  केलं तर गाडगीळ १०% discount देतात" अश्या comments सुरु केल्या. इथेही परत मागचीच कहाणी सुरु झाली. यावेळी मला मान आणि पाऊलाबरोबर एक हात ठेवायलाही जागा मिळाली होती. बर्‍याच वेळानी, "यात काहीच काळे मणी नाहीयेत..", "कसलं जड आहे.. ", "हे काय मंगळसुत्र वाटतयं का ? वाट्यांचच दाखवा..", "सगळे काळे मणीच दिसतायत.." अश्या अनेक संवादांनंतर, सोनं आणि काळे मणी यांच गुणोत्तर जमुन मंगळसुत्र खरेदी संपली.आता मात्र माझा संयम संपला. सकाळी चहा, पॅटिस, इडली-सांबार असा किरकोळ नाष्टा केल्याने भुकेचा आगडोंब उसळला होता. त्यामुळे अन्न मिळाल्याशिवाय पुढे जाणे नाही असा पवित्रा मी घेतला. त्यावर समस्त महिलावर्गानी लगेच सहमती दर्शवली.त्यामुळे आता खरेदी संपली आणि जेऊन दुपारच २-३ तास लवंडता येईल या आनंदात काही क्षण जातात न जातात तोच, "चालेल..आता जेऊयात..पाटल्या-बांगड्यांच जेवणानंतर बघु" हे सासुबाईंच वाक्य आलं. ते ऐकताच आज दुपारचं जागरण होणार हे लक्षात आलं. (मी सांगतो तुम्हाला...दुपारचं जागरणं प्रकृतीला वाईट..त्यातुन शनि-रविवारचं तर फारच वाईट..). मग जेवण, पाटल्या-बांगड्यांची खरेदी संपवुन, गाडगीळांवरुन खुप पैसे ओवाळुन टाकुन घरी यायला रात्र झाली. अश्या प्रकारे 'लग्नची खरेदी' या प्रकाराशी माझा पहिला 'encounter' झाला ! पण हे काहीच नाही अशी साड्यांची खरेदी बाकी होती.
  
साखरपुड्याच्या एकाच साडीच्या खरेदीने माझा चिमुकला मेंदु freeze  झाल्यामुळे, मी 'साडी' या वस्तुच्या वाटेला जाणार नाही ही प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे साडी खरेदीचा विषय निघताच, "साडी खरेदीला मी कशाला ? मला काय कळतयं त्यातलं ? तु जाऊन ये  बाकीच्यांबरोबर.." असं सुचवल्यावर, (डोळे मोठे करुन), "आपल्या लग्नाची साडी घ्यायला मी एकटीच जाऊ ??" असा प्रश्न वजा फटकारा आला. आता, "तु एकटी कशी ? तुझी आई, माझी आई, तुझी काकु, मामी पण असणार, साडी आपल्या लग्नाची असली तरी तु नेसणार आहेस, आणि मला सर्वच साड्या सारख्याच बर्‍यावाईट वाटतात" असं म्हणावसं वाटलं. पण लॉजिक, बायको आणि साडीखरेदी या गोष्टी एकत्र जात नाहीत. असं बोलल्यास वातावरणाचं तापमान वाढतं, चेहेर्‍याचा रंग बदलतो, आवाजाची पट्टी आणि धार चढते आणि ठिणगीचा वणवा होऊ शकतो असा पुर्वानुभव असल्याने गप्प बसलो.

शेवटी एका रविवारी तो प्रसंग आलाच. अनुभवी खेळाडु, (बाबा आणि सासरे !) घरीच राहिले. लक्ष्मीरोडवरच्या एका दुकानातल्या एका विक्रेत्यापुढे जाऊन बसलो. तो एका मागुन एक अश्या साड्या उलगडत होता आणि समस्त महिलावर्ग चेहेर्‍यावरची माशीही हलु न देता समोर बसला होता.

"ऊं हुं.."
"ही नको.."
"असली नको.."
"छे ही तर नकोच.."
"काहीतरीच रंग आहे.."
"जरा तरुण मुलींच्यादृष्टीनी दाखवा हो.."
"नविन माल नहिये का ?"
"फ्रेश नाही वाटते पीस.."
"जरा वर्क वाली दाखवा.."
"फारच वर्क आहे.."
"या design च्या बुट्ट्या फारच मोठ्या मोठ्या आहेत.."
अश्या आणि इतर अनेक कारणांमुळे साड्या reject  होत होत्या.या दुकानातुन त्या दुकानात भटकंती चालु होती. मी नंतर विचार करणचं बंद केलं.नंतर नंतर तर एखद्या विक्रेत्यानी मोठ्या मोठ्या बुट्ट्यांची किंवा नकोश्या रंगाची साडी काढल्यावर मीच नर्व्हस व्ह्यायचो की आता या बायका नाकं मुरडणार.शेवटी 'Exclusive' वाल्या कासटांकडे मंडळी स्थिरावली. काही साड्या बघुन डोळे लकाकले. एखाद-दुसरी साडी 'ड्रेप' झाली. शेवटी स्वतः मालक , कासट, मैदानात उतरले. अनेक तासांनंतर सर्व साड्या कासटांकडे मिळाल्या.मला परमेश्वराच्या अस्तित्वाचा साक्षात्कार झाला.कासट विजयी झाले.या अनुभवावरुन, ज्या दुकानात विक्रेता अतिशात सहनशील असतो, अनेक साड्या उलगडुनही  "याच रंगाची पटोला आहे का हो ?" या प्रश्नाला "आहे की..काढतो..गणु...रेड मधे पटोला घे.." (मग प्रत्यक्षात असो वा नसो !) हे उत्तर देऊ शकतो, तिथेच साडी विकली जाते, असं माझं मतं झालं आहे.
या मुख्य खरेदीशिवाय बाकी खरेद्या चालुच होत्या.

"मला किनई एक पर्स घ्यायचीय.."
"का का पण का ?? तुझ्याकडे २-३ मोठ्या  पर्स आहेत,५-६ छोट्या पर्सेस तुझ्या खोलीत इकडे तिकडे पसरलेल्या मी स्वतः पहिल्यात..१-२ तर माझ्याच समोर लोकांनी भेट दिल्या.. "
"हो...पण त्यातली कुठलीच 'functional use"  ची नाहिये.."
"............................."

"मला किनई १-२ साड्या घ्यायच्यात.."
"का का पण का ?? तुझ्याकडे already  कपाटभर साड्या आहेत, ५-६ तु आईच्या मारलेल्या आहेस, डझनभर लग्नासाठी घेतल्या..."
"पण त्या सगळ्या खुप भारी आहेत..१-२ अश्याच साध्या function साठी हव्यात नं.. "
"............................"

"मला किनई २-३ चांगल्यापैकी ड्रेस घ्यायचेत.."
 "का का पण का ?"  (आता काय तेच तेच लिहायच भाऊ..घ्या समजुन..)
"पण 'casual ware' ला असे चांगले नाहीयेत."
"............................"

'Functional ware', 'Casual Ware', 'Party ware', 'असेच ware', 'रोजच्यासाठी ware', 'office ware', हे सगळं मानवी बुध्दिमत्तेपलीकडचं आहे असं आताशा वाटायला लागलयं.
आता कळतं रामदास स्वामी लग्नातुन का पळाले ! असं काहीसं घडलं असेल..त्या लग्नतयारीनी, न संपणार्‍या खरेदीनी कंटाळुन बोहल्यावर उभं राहिल्यावर ऐत्यावेळी त्या भटजींना आपली गायकी दाखवायची हुक्की आली असेल.त्यावर वैतागुन "अहो गुरुजी, फार कंटाळलोय हो या लग्न तयारीला ,खरेदीला, आटपा लवकर.. " असं म्हटल्यावर गुरुजी म्हणाले असतील, "अहो रामभाऊ, घ्या सवय करुन ..सगळा संसार करायचाय इथुन पुढे तुम्हाला !" यावर वास्तवाची जाणीव होऊन ते पळाले असतील. रामदासांच सोडा हो. ते आपल्या सारखेच मानव होते. पण भगवान श्रीकृष्णानीही १४००० बायका केल्या आणी मग गीता सांगितली  "कर्म्ण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनं" ! देवाधिदेवाची ही अवस्था तर त्यापुढे आपली काय कथा ! (पण श्रीकृष्णाला १४००० सांभाळाव्या लागल्या..आपली एकच आहे...तेवढी जमेल अशी आशा करायला हरकत नाही, काय ? )