Wednesday, November 18, 2009

विविधगुणदर्शन

दरवर्षी आमच्या University मधे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. प्रत्येक university मधे असत त्याप्रमाणे आमच्याकडेही Indian Student Association (ISA) नामक प्रकरण आहे. या अद्वितीय संस्थेच्या वतीनी हा कार्येक्रम आणी नवीन विद्यार्थांचा स्वागत समारंभ आयोजित केला जातो ( स्वस्तातला स्वस्त cake आणि पैसे असल्यास 'coke' 'pepsi' नामक टाकाऊ वस्तु..) . याच निमित्तानी अजुन एक नयनरम्य सोहळा या दिवशी बघायला मिळतो. तो म्हणजे नविन Indian Student Association Committee ची निवडणुक. आधीच टिचभर असलेल्या Indian Student Community मधुन ४ लोक विविध पदांसाठी निवडण्यात येतात. एखाद दुसर जुनं टाळक आणि एक दोन नविन बकरे अशी committee तयार करण्यात येते. कोणीच उत्सुक नसल्यामुळे दुसर्याच्या नावाने गजर, हळु आवाजात आप्तस्वकीयांचा उद्धार अस सगळ यथासांग पार पडल्यावर नविन committee कामकाजाची शपथ घेते.( पण आमच्या या नखाएवढ्या association ला 'घटना' ही आहे हे मला या वर्षीच कळल..) या committee ला आपल्या एका वर्षाच्या कार्यकाला मधे २ कार्येक्रम यशस्वी करुन दाखवावे लागतात. एक "India Night" - भारतीय विद्यार्थांच्या विविधगुणदर्शनाचा उत्सव ,दोन - "World Unity Fair" या University च्या International Office तर्फे भरवण्यात येणार्या प्रदर्शनामधे भारतीय संस्कॄती दाखवणारा booth आणि त्यावर भारतीय खाद्यपदार्थांची विक्री. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यामधे साधारण एका आठवड्याच्या अंतरानी हे दोन्ही कार्येक्रम होतात.
गेल्या वर्षी एक नामचीन तिलंगी ( direct from Hyderabad without any alteration ...असली चीज ) ISA President होता. आपण काहीही न करता वसावसा अंगावर येणारी काही लोक असतात. काही लोकांना प्रत्येक बाबतीत टोकाच मत देण्याची सवय असते. तर काही लोक समोरच्याला चमचाभरही अक्कल नाही आणि आपला IQ आईनस्टाईनलाही खाली मान घालायला लावणारा आहे या समजुतीनी मत ठणकावतात. हा इसम या सर्व गुणांचा अभुतपुर्व संगम होता. ( पुण्याचा नसुनही !!!) त्यामुळे यावर्षीच्या नविन committee निवडण्याच्या प्रक्रिये मधे त्यानी आमुलाग्र आणि मुलभुत बदल सुचवले. इच्छुक व्यक्तिंनी आपल नाव e-mail द्वारे कळवाव आणि Indian Students नी आपल vote ही e-mail नी द्याव अशी योजना होती. आता १५ ऑगस्ट च्या दिवशी प्रत्यक्ष अनेक लोकांनी ढकलुनही कोणी पुढे येत नसल्यामुळे या e-mail च्या hi-tech पद्धतीमधे कोणताच दीडशहाणा पुढे आला नाही. Committee मधे येण्यासाठी वा मत देण्यासाठी अश्या कुठल्याच प्रकारच्या e-mails आल्या नाहीत. शेवटी वैतागुन या हैदराबादच्या सुपुत्रानी जराही न डगमगता आपल्या इच्छेनुसार आठवतील त्या माणसाला फोन लावायला सुरवात केली. "तुने last year भरतनाट्यम किया था । तु Cultural Secretary बनेगी ।" " तु ISA Yahoo Group पे बहुत mail करत है । तु Communication Director बनेगा । (आहे का..आहे का आवाज ? टीचभर Indian Students च्या Yahoo Group ला सांभाळणारा Communication Director !! ) अश्या Orders द्यायला सुरवात केली आणी बहुतेक जागा निकालात काढल्या. पण अजुनही President ची जागा शिल्लक होती.
सप्टेंबर उजाडला. गणपती आले. तरीही हा गोंधळ संपेना. महाराष्ट्रात कॉग्रेसनी सरकार स्थापनेला लावला नसेल एवढा वेळ या वर्षीच्या committee ला लागत होता.गणपतीच्या पहिल्या दिवशी या 'काळजीवाहु president' नी आपल्या निवासस्थानी गणेशपुजा ठेवली होती. त्या पुजेला उपस्थित रहण्याची इच्छा बापुंनी प्रदर्शीत केली. [ आता जर 'बापु कोण ?' हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही इथे नवखे आहात. माझ्या आधीच्या posts तुम्ही वाचलेल्या नाहीत. तरीही या अपराधाबद्द्ल क्षमा करुन मी तुम्हाला माझी 'ढेकुण' नावाची post वाचावी हा सल्ला देतो. त्यात बापुंच्या व्यक्तीमत्वाची तोंडओळख आहे. ते वर्णन हे पाण्यावर तरंगण्यार्या हिमनगासारख आहे. समग्र चिकित्सेसाठी ज्ञानकोशाच्या जाडीचा ग्रंथ लागेल. ] तर त्या ठिकाणी पुजेनंतर "President कोण ?" ही चर्चा सुरु झाली आणि "President मिळत नाही " ही समस्या आणि त्यावर उपाय हा मुद्दा उपस्थित झाला. 'समस्या' आणि त्यावरील 'सल्ला' हे दोन शब्द कानावर पडताच बापु पुरंधरवरच्या मुरारबाजीप्रमाणे रणांगणात उतरले. विविध मार्ग आणि तिथे जमलेली लोक सोडुन भारतीय असण्याची शक्यता वाटण्यार्या सर्व students ची नामावळी सादर केली. यामुळे आधीच्या सर्व मनस्तापानी डोक out झालेल्या तिलंग्याच माथ सणकल. आणी त्यानी उलट बापुंनाच "तो तु क्यों नही बनता president ? तुझे इस semester कोई coursework नही है । तेरा सिर्फ thesis का काम बचा है । कमसे कम एक साल तो तु graduate नही होगा । बस्स...तुही president बनेगा । " असा त्या गजाननाच्या साक्षीनी 'verdict' सुनावला.
अचानक झालेल्या या प्रतिहल्ल्यानी बापु गांगरले. डाव असा उलटलेला बघुन त्यांच्या तोंडुन शब्द फुटेना. त्यातुन बापुंना अधिक काही बोलायची संधी न देता आजुबाजुच्या लोकांनी प्रस्तावाला अनुमोदन देउन बापुंच्या नावाचा जयजयकार केला. आता मात्र बापु द्विधा मनस्थितित सापडले. 'हो' म्हणाव तर भलतच लचांड गळ्यात पडत आणी 'नाही' म्हणाव तर अब्रु जाते. शेवटी ISA च्या उद्धारासाठी बापुंनी president पदाचा विडा उचलला आणी गजाननसमोर शपथ घेतली (बोट न कापता ...).
एकदा हे शिवधनुष्य उचल्यावर मात्र बापु कामाला लागले. पहिल्यांदा treasurer म्हणुन आधी सुचवलेल्या कोण्या एक टिनपाटाला हाकलुन देऊन तिथे आपला कोल्हापुरी पंटर नेऊन बसवला आणि पैसा आपल्या हातात राहिल याची काळजी घेतली. यानंतर बापुंनी सगळ्या committee ला कामाला जुंपल.गेल्या १० वर्षांत मिळुन जेवढ्या meetings झाल्या नसतील तेवढ्या meetings बापुंनी एका महिन्यात घेतल्या. आमच्या apartment च्या दिवाणखान्यात आपल्या जगप्रसिध्द खुर्चीवर 'विचारताक्षणी सल्ला' या पावित्र्यात बसलेल्या बापुंच दर्शन दुर्मिळ झाल. ते रात्री अपरात्री घरी परतु लागले. पण एवढी सगळी तयारी होत असुनही कार्येक्रमाची संकल्पना, रुपरेखा, नविन बदल यातल काहीच आम जनतेपर्यंत पोचत नव्हत. एवढ्या गुप्ततेच कारण मला आणी माझ्या दुसर्या roommate ला समजेना. शेवटी एका शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आम्ही बापुंना गाठल आणी खोदुन चौकशी केली. मिळालेल्या माहितीनी आम्हा दोघांना रात्रभर झोप लागली नाही. एखाद्या भयंकर खुनाचा कट सांगावा अश्या अविर्भावात "रात्र वैर्याची आहे...या कानाचे त्या कानास कळु न देणे..." अश्या प्रस्तावनेनंतर बापु वदले..."या वेळच्या कार्येक्रमाची प्रमुख पाहुणी म्हणुन माधुरी दिक्षितला बोलवायच घाटत आहे...!!!! "
..ऑ ?? direct माधुरी ??..... मान्य आहे की ती शेजारीच Denver ला रहाते...Denver च्या मॉल्समधुन खरेदी आणी घासाघीस करताना लोकांना दिसते...अमेरिकेतल्या चारचौघांप्रमाणेच तिच घर आहे...सध्या तिला पोरंबाळं (..आणी नवरा) सांभाळण्या पलीकडे दुसरा उद्योग नाही..ती एकदा Denver महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवात आली होती..सगळ मान्य ...पण याआधी प्रमुख पाहुणा म्हणुन university च्या dean लाही न बोलावता direct माधुरी ? पण बापु ऐकेनात. त्यांनी fielding लावली. Denver महाराष्ट्र मंडळ, Northern Colorado Indian Association अश्या विविध मार्गांनी प्रयत्न सुरु केले. इकडे मी आणी माझा दुसरा roommate तिच्या डावीकडे मी उभा रहाणार का उजवीकडे तो यावर चर्चा करत होतो. तिच्याशी मराठीत बोलाव का English मधे यावर माझा गोंधळ उडाला होता. कार्येक्रमानंतर तिला घरी जेवायच निमंत्रण द्याव असाही विचार होता...पण एक दिवस बापु खाली मान घालुन आपल्या आसनावर निराश बसलेले आढळले. अधिक चौकशीअंती माधुरी सहकुटुंब LA ला निघुन गेल्याच कळल. [ ती येऊ शकणार नाही या पेक्षा आपल्याला न सांगता कशी निघुन गेली याचच दुःख बापुंना अधिक झाल असाव असा आमचा अंदाज आहे.] बापुंनी स्वतः फोन लावला असता ती सहकुटुंब धावत आली असती असा आजही आमचा विश्वास आहे.पण झाल्या प्रकारानी खचुन न जाता committee नी एका dance च्या आधी माधुरीच्या फोटोंचा slide show दाखवुन आपली तहान भागवली.
Committee नी प्रत्यक्ष कार्येक्रमाची आखणी तर जोरकस केली होती. कोणतीही अडचण त्यांच्या समोर टिकु शकत नव्हती.आमच्या सुप्रसिध्द 'fashion show' ला आयत्या वेळी एक जण कमी पडत असल्याच लक्षात येताच दोन चार दिवस आधी रात्री १२ वाजता "तु fashion show' मधे चालणार" असा committee च्या cultural secretory चा मला फोन आला.
fashion show ?? मी ?? आमच्या गेल्या २१ पिढ्यात stage वर कोणी गंमत म्हणुनही गेल नव्हत ( त्या आधीच माहित नाही !!..बाबांना विचाराव लागेल...). पण आता fashion show साठी मला फोन करावा लागला म्हणजे या लोकांवर खरच अनावस्था प्रसंग ओढवला असणार हे लक्षात आल.अधिक चौकशीअंती प्रस्तुत fashion show हा तथाकथित fashion show नसुन भारतीय वेशभुषेच प्रदर्शन करणारा कार्येक्रम आहे अस कळल. 'फक्त चालायच आहे stage वर महाराष्ट्रीयन कपडे घालुन' अस सांगण्यात आल. आता अस्सल महाराष्ट्रीयन वेशभुषेत धोतर येत. माझ्याकडे धोतर नव्हत. ( नसणारच...का असाव ? अमेरिकेला येताना ज्या अनंत गोष्टी घेऊन याव्या लागतात त्यामधे धोतरजोडीही आणली असेल अशी अपेक्षा का ठेवली जावी ?? असो.) आणी असत तरीही ते न सुटता १५-२० पावल चालता येईल अस नेसण हे कर्मकठीण काम होत. म्हणुन भर stage वर आयुष्यातल्या पहिल्याच fashion show मधे महाराष्ट्रीय संस्कृतीच भलतच दर्शन अमेरिकन लोकांना घडु नये यासाठी धोतर बाजुला ठेवल.तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. 'फक्त चालायच' हे जरी खर असल तरी 'पाय अडखळुन तोंडावर पडलो तर काय ?' 'त्या stage वरच्या झगमगाटात आणी मुजिक च्या गोंधळात भलतीकडेच चालत गेलो तर काय ?' ' कधी चालायला सुरवात करयाची आणी कधी थांबायच हे न कळुन मोरु झाला तर काय ?' असे अनेक भुंगे डोक पोखरत होते. आयत्या वेळी stage वर 'सिन्दन्ती मम गात्राणी' होणार नाही याची खात्री मी शेवट पर्यंत स्वतः ला देऊ शकलो नाही. प्रत्यक्ष fashion show मधे stage वरच्या दिव्यांनी डोळे दिपुन काहीच न समजल्यामुळे मगरीसारखा एका रेषेत चालुन परत आलो. नंतर लोक बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन 'तु भलताच सरळ चाललास की रे..." अस का सांगत होती ते मला अजुनही कळलेले नाही.
बापुंनीही आपल्या नावाचा आणि प्रभावाचा आयोजनात पुरेपुर उपयोग करुन घेतला. २ तासांच्या कार्येक्रमाला काही मिनिटं कमी पडत असलेली पाहुन Northern Colorado Indian Association च्या लहान मुलांचे कार्येक्रम बसवण्यार्या मराठी नृत्यदिग्दर्शीका बाईंना तात्काळ फोन लावुन त्यांच्या मुलांचा एक नाच निश्चित केला. आता या बाई म्हणजे अट्टल पुणेरी. [ 'अट्टल' हे विषेशण चोर दरोडेखोर अशा शब्दांसाठी वाचायची आपल्याला सवय आहे. पण 'पुणेरी' या शब्दामागे 'अस्सल' नाही तर 'अट्टल' हेच विषेशण योग्य आहे अस माझ प्रामाणिक मत आहे.]. या बाईं दिवाळीच्या कार्येक्रमात भेटल्यावर " मी किनई या कोजागिरीला तुम्हा सगळ्या मराठी मुलांना घरी जेवायला बोलावणार आहे. माझ्या फोनची वाट बघा." अस तोंड भरुन आमंत्रण देऊन लुप्त झाल्या. त्यानंतर थेट India Night च्या practice ला November मधे उगल्यावर "अरे माझ्या cell ची memory च उडाली बघ...पण तुम्ही नाही का phone करायचात ?" हे वर ऐकवल. पुण्यात असतो तर "बाई, तुम्ही फुकट जेवायला द्याल अस स्वप्नातसुध्दा वाटल नाही हो..म्हणुन नाही केला फोन" अस उत्तर दिल असत. पण...असो.
या सगळ्या धामधुमीत बापु फक्त आपल्या आसनावरुन आदेश (नाही..तो नाही...बाळासाहेबांनी माहीमला दिला तो वेगळा..हा वेगळा..) सोडत होते अस नाही तर स्वतः एका skit मधे भाग घेउन त्यानी 'leading from the front' चा उदाहरण घालुन दिल. या skit चे लेखक, दिग्दर्शक, प्रमुख भुमिका (मुलाचे वडिल..!!) none other than बापु होते. अस हे भारतीय लग्न संस्थेवर भाष्य करणार विनोदी, गंभीर आणी वैचारिक , सबकुछ बापु असलेल skit लोकांनी फारच उचलुन धरल.
अश्या प्रकारे आमच्या university च्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट असा कार्येक्रम कुठल्याही तांत्रिक बिघाडाविना (projector बंद पडणे, slide show चालु न होणे, भलत्याच नाचाला भलतच गाण, नाचणारी मुलगी एकीकडे आणि ढुंढो ढुंढो रे करत तिसरीकडेच फिरणारा spot light इत्यादी) पार पडला

आमच्या university च्या library मधल्या उंचच उंच भिंतिंवर अनेक लोकोत्तर माणसांची (donation देणार्या...) नाव कोरली आहेत. त्याच प्रकारे बापुंची ही अद्वितीय कामगिरी पिढ्यां पिढ्या (विद्यार्थांच्या ....) लक्षात रहावी यासाठी university च्या मुख्य चौकात बापुंच नाव कोरलेली फरशी बसवावी आणी आमच्या university चा mascot RAM - 'the मेंढा' याच्या पुर्णाकृती पुतळ्याशेजारी बापुंच्या हातापायांचे ठसे असलेला concrete चा दगड लावावा यासठी मी आणी माझ्या दुसर्या roommate नी जोरदार lobbying सुरु केल आहे.


Sunday, October 11, 2009

प्रश्नोपनिषद

अत्यंत अनिच्छेने डोळे चोळत सकाळी स्वतःच्या दोन पायांवर उभा झालो आणि माझा room-mate म्हणाला, "अबे अपनेको यहां आके आज दो साल हो गये..". तेव्हा मनात म्हटल "च्यायला...खरच की....दोन वर्षापुर्वी याच दिवशी या अमेरिका नावाच्या विचित्र देशात पाय ठेवला होता. मग काही क्षणातच दोन वर्षात आयुष्यात झालेली प्रचंड उलथापालथ डोळ्यासमोर तरळुन गेली. (म्हणजे फारस काही नाही..एक degree मिळाली.)

सहज म्हणुन बापुंच्या खोलीत डोकावलो.( तुम्हाला 'बापु' माहित नाहीत ??...कॄपया माझी 'ढेकुण' नावाची post पहा..). तर बापु उलटे झाले होते. म्हणजे शिर्षासनावस्थेत होते. दोन वर्षापुरवी हे दॄष्य बघुन धक्का बसला होता. त्याआधी उलट्या डोक्याची सरळ माणस खुप भेटली होती. पण तल्लख डोक्याचा माणुस स्वखुशीनी काही वेळ का होइना उलटा होतो हे पहिल्यांदाच बघत होतो. पण आत सवय झाली आहे. माझ्या दुसर्या room-mate च्या मते 'बापु उलटा होके वो सोच पाते है जो हम सीधा रहके नही सोच पाते इसलिये बापु हमेशा दुनिया के दो कदम आहे रहते है ।कधी साक्षात बापु 'confuse' झाल्यासारखे वाटले तर 'जरा उलटे होउन बघा काही सुचतय का' अस आम्ही सुचवुन बघतो.

डोक्यावरुन दोन पायांवर 'land' होऊन बापुंनी दर्शन दिल आणि नविन शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातुन एक नवा विद्यार्थी येत असल्याची माहिती दिली. आमच्या university च्या १०० वर्षाच्या इतिहासात मी, बापु आणि कौस्तुभ नावाचा माणुस असे तिघच महाराष्ट्रापार झेंडे लावायला इथे पोचलो अशी माझी प्रामाणिक समजुत असल्यामुळे कोणीतरी महाराष्ट्रातुन येत आहे याचा आनंद झाला.आता इथे काही गोष्टींचा खुलासा करण आवश्यक आहे. आमच्या university मधे येणारी अथवा येऊ ईच्छिणारी व्यक्ती प्रथम बापुंना contact करते. मग बापु त्याला अथवा तिला आपल्याकडील शक्य तितकीमाहिती देऊन इष्ट व्यक्तीकडे (त्या त्या department प्रमाणे...) सुपुर्त करतात. University मधे भारतातुन पोचणारा विद्यार्थी international office मधेही जाता प्रथम बापुंच्या lab-office मधे त्यांच दर्शन घेतो आणि पुढील कामाला लागतो. कधी कधी मला आणि माझ्या दुसर्या room-mate ला अशी साधार भिती वाटते की यामुळे कधितरी बापुंचा श्रीलंकन adviser डोक्यात राख घालुन घेईल, "अरे काय लावलय काय ? Lab आहे का S.T. ची inquiry window ? आत्ताच्या आत्ता आपल सामान घेऊन बाहेर हो...." अस सिंहली मधे ओरडेल आणि बापु रस्त्यावर येतील. पण बापुंच्या जबरदस्त व्यक्तीमत्वापुढे तोही नमला आहे. या अभुतपुर्व समाजसेवेबद्द्ल नुकतच बापुंना indian student association या संस्थेच सर्वोच्च प्रमुखपद एकमुखानी बहाल करण्यात आल. तर प्रश्न विचारत येणारी दिनवाणी, अज्ञानी जनता बापुंना नवीन नाही. एकाहुन एक नाठाळ, illogical प्रश्नकर्ते बापुंनी पचवले आहेत. पण येणार्या या महाराष्ट्राच्या सुपुत्रानी सगळ्यांवर कडी केली. यायच्या आधी भारतातुन आणि प्रत्यक्ष आल्यावर साक्षात प्रश्नोपनिषद उभ करुन बापुंचे डोळे पांढरे केले. हे सर्व संभाषण electronic स्वरुपात उपलब्ध असुन त्यातील काही भाग खाली वानगी दाखल देत आहे.पुढे मागे हे सर्व संवाद ग्रंथरुपाने ( बापुंच्या प्रस्तावनेसकट..) प्रसिध्द करण्याचा आमचा विचार आहे.

तर सोयीसाठी आपण त्या व्यक्तीच नाव देशपांडे आहे अस धरुयात. खालील सर्व संभाषण 'मिंग्लिश' नावाच्या भाषेत असुन गरज पडल्यास भाषांतरासाठी तज्ञांची मदत घ्यावी. कंसातील संवाद हे बापुंच्या मनातील आमच्याजवळ व्यक्त केलेले त्रस्त विचार आहेत.


(..email वरुन नमस्कार-चमत्कार झाल्यावर एक दिवस देशपांड्यानी 'basic' पासुन सुरवात केली..)

देशपांड्याः hiiiii

बापुः Hi.

देशपांड्याः wat are the facilities available in offcampus appt's kitchen ?

बापुः my apt has oven, dishwasher n fridge...

देशपांड्याः okk...how much is the rent ?

बापुः ... $

देशपांड्याः and how many you share it ?

बापुः 3

देशपांड्याः I have heard that more than 3 is illegal..

बापुः ya ( आमच्या मित्रांच्या room war एक illegal रहातो. तो building च्या आसपास असला की चोरासारखा वावरतो आणि दार वाजल की बाथरुम मधे लपुन बसतो...)

देशपांड्याः what kind of dresses do we need to use after coming there?

बापुः means ? ( ??? ... हा माणुस गडचिरोली जिल्ह्यातल्या अदिवासी भागातला आहे का? जे लंगोटी आणि हातात धनुष्यबाण घेऊन वावरतात ?)

देशपांड्याः i mean i heard tat nobody uses there shirts only t shirts are used...

बापुः ( कोण ? कोण ? तुला या गोष्टी सांगत रे ? महाराष्ट्रात तो माणुस भेटला तर त्याचे कपडे काढुन हाकलुन देईन... ) come prepared with all kinds of thermal weather...

देशपांड्याः even in college we dont need to have formals na?

बापुः नाही..( सध्या summer असल्यामुळे professor आणि विद्यार्थी अर्धी चड्डी आणि T-shirts मधे मुक्त संचार करत असतात....तु फक्त कपडे घाल म्हणजे झाल..)

देशपांड्याः I am planning to bring a blazer..

बापुः ok. ( तु धोतरजोडी घेऊन आलास तरी चालेल ...फक्त मला सांगु नकोस..)

देशपांड्याः & even searching for Polo Collar t shirts

बापुः hmm..( का ? का ? का ? मलाच का ?)

देशपांड्याः wat dress shall I wear when i step on US ???

बापुः anything ..its not a big deal ( traditional कपडे घालुन आल्याशिवाय अमेरिकेत सोडत नाहीत...so धोतर, कोट, पगडी ( झिरमिळ्यांसकट..) आणी पायात पादुका हे घालुन ये )

देशपांड्याः i need to get Ramcard first na?

बापुः what ? ( इथे देशपांड्यानी बापुंची विकेट घेतली..यायच्या आधीच बापुंना माहित नसलेली माहिती मिळवली. )

देशपांड्याः i read that this card is ID, library card, computing fascility card ....in all its everything

बापुः ( आता मात्र साक्षात बापुंचा सयंम डळमळु लागला..) ..for that first u need to come to CSU...मग आल्यावर त्याचा विचार कर.

देशपांड्याः ok. उद्या TB test ( जी यायच्या आधी करावी लागते..) चा report आणायला जायच आहे. ( लगेच india मधल्या कामाच reporting..)

बापुः k.

देशपांड्याः how do u manage financial transactions over there?

बापुः we have a bank on campus ( mainly हवाला..i personally prefer smuggling..)

|| ||

देशपांड्याः hi senior .. ( ही case दिवसेंदिवस हाताबाहेर चालली होती..)

बापुः hi

देशपांड्याः good morning

बापुः good night

देशपांड्याः :) ( ' good night ' चा चिमटा देशपांड्याच्या डोक्यावरुन गेला.. ) r u there ?

बापुः ya

देशपांड्याः ok..its better

बापुः ... ( its better ? its better ? तु ये रे...तु फक्त इथे पोच..)

देशपांड्याः when will all professors will come back from summer vacation?

बापुः no idea (lets see..everybody has not reported to me before going...i need to be more strict about this next time..i need to send those defaulters warning email...everybody should come back by august ...but that maths prof is very adamant i will see to him)

बापुः they plan their holiday according to their convenience ...some profs take holidays when they want.. ( है शाब्बास..)

देशपांड्याः lucky they r...( हिंदी मधे एक फार चागली म्हण आहे....गिरे तो भी टांग उप्पर..)


|| 3 ||

देशपांड्याः which shuttle service u will suggest from airport ?

बापुः greenride is cheaper

देशपांड्याः sure..bt wat abt luggage?

बापुः pls see their website ( या shuttle service मधे फक्त माणस allowed आहेत...luggage साठी airport च्या बाहेर खेचर बांधलेली असतात..airport वर पोचल्यावर counter वर चौकशी कर.. )

देशपांड्याः do we need to provide them drop off address ?

बापुः ya ( नाही नाही. अजिबात नाही. ते नविन students ना शहराच्या जवळच्या जंगलात सोडतात..मग तुम्हाला रस्ता शोधत इष्ट ठिकाणी पोचाव लागत..)


तर या वरिल उदाहरणांप्रमाणे, या व्यक्तीच्या बापुंशी झालेल कित्येक तासांच आणी अनेक lines संभाषण फक्त 'प्रश्न आणी उत्तर' या स्वरुपात आढळत. या माणसाला प्रश्नांचा अतिसार झाला असावा अशी आमची शंका आहे. आणी रोग आटोक्यात आल्यास बापुंच्या मानसिक स्वास्थ्यासाठी त्यावर खास 'पुणेरी पध्दतीनी' उपचार करण्याच्या आमचा विचार आहे.

Friday, September 25, 2009

कुत्र

मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे. सोन्यासारखा शनिवार होता. आदल्या रात्री तुडुंब जेऊन, internet वर movie मघुन आरामात झोपलो होतो. सकाळ सकाळ १० वाजता जाग आली होती. मग थोड इकडे तिकडे करुन दुपारच जेऊन वामकुक्षी साठी १ च्या सुमारास लवंडल्यावर साधारण दोन अडीच तासांनी डोळे उघडले होते. चहा की आंघोळ या गहन प्रश्नावर विचार करत मी kitchen मधे उभा होतो. तेवढ्यात डोळ्याच्या एका कोपर्यातुन घराच्या उघड्या दारातुन काहीतरी पांढर आत सरकताना पाहिल. Room वरच्या बाकीच्या ३ महाभागांपैकी कोणितरी दरवाजा उघडा ठेऊन नष्ट झाला होत. जवळ गेलो तर एक छोट कुत्र आत शिरल होत. मी शक्य तितक्या चपळाईनी दरवाजा बंद करण्याच्या आत ते समोरच्या कोचाखाली गेल. वाकुन बघितल तर मोठ्याथोरल्या कोचाच्या पार टोकाला ते जाउन बसल होत.

आता अमेरिकेत 'कुत्रा' ही अतिशय मुल्यवान वस्तु आहे. आमच्या office मधे एकानी त्याच्या कुत्रांच्या जोडीला झालेली पिल्लावळ विकायला काढली होती. जन्माला आल्यापासुन ते आतापर्यंतचे त्यांचे फोटो, रंग, वजन, ती कशी खेळकर आहेत वगैरे माहिती असलेली e-mail सर्वाना पाठवली होती. नंतर प्रत्यक्ष येऊनही 'marketing' करुन डोक उठवत होता. आता डोळे फिरवणारी ती किंमत देऊन विकतच दुखण घ्यायची अजिबात ईच्छा नसल्यामुळे ( आणि already room वरचा गोंधळ प्राणिसॄष्टीलाही लाजवणारा असल्यामुळे ) त्याला मोठ्या मुश्किलिनी कटवला होता.

त्यातुन 'हरवलेली कुत्री' हे अमेरिकेत अजुनच वेगळ प्रकरण आहे. भारतात माणुस हरवला तरी कोणी विचारत नाही. "येईल परत भुक लागली की..." हे आमचा एक मित्र BSc पहिल्या वर्षाला नापास होऊन घरातुन पळुन गेल्यावर त्याच्या वडिलांनी आमच्या समोर काढलेले उदगार आहेत. (त्या मित्राच्या मते मात्र तो घरातुन 'पळुन' नव्हे तर 'निघुन' गेला होता. आता ही दोन क्रियापदे वेगळी असली तरी क्रिया एकच आहे अशी आम्हा मित्रांची तोपार्यंत समजुत होती. पण लोकसभेत पैसे खाऊन खाऊन माजलेले खासदार जसे 'भ्रष्टाचाराच्या' निषेधार्थ 'सभात्याग' करतात तसा हा नंतर होणार्या वडिलांच्या स्फोटाच्या निषेधार्थ आधीच 'निघुन' गेला असावा असा आमचा अंदाज आहे.) पण अमेरिकेत मात्र चौकाचौकात "माझा लाडका कुत्रा ... कालपासुन हरवला असुन तो या या जातीचा ...रंगाचा ...उंचीचा आहे. शोधुन देण्यार्यास योग्य बक्षिस देण्यात येइल." आणि याच्या वरती फोटो... अशी पत्रक आढतात. एका मधे तर खाली 'तु कुठे निघुन गेलास ? लवकर परत ये.. असही व्याकुळ आवाहन होत. ( फक्त ..बाबा आजारी आहेत. आईनी अन्न पाणी सोडल आहे..याची कमी होती.) परवा आमच्या building च्या खाली एक कुत्र सापडल्याची आणि कोणाच असल्यास घेउन जाण्याची सुचना देणारी notice लावली होती. त्यामधे 'या कुत्र्याच्या गळ्यात नावाची चिठ्ठी नसल्यामुळे ओळख पटवण्यासाठी प्रश्नोत्तरांचा कार्येक्रम करावा लागेल अशीही सुचना होती. म्हणजे मालकाला कंटाळुन ते कुत्र घरातुन 'निघुन' आल तरी त्याच्या नशिबी स्वातंत्र्य नाही. कारण 'भटकी कुत्री' ही जमात अमेरिकेत अस्तित्वात नाही. ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.

त्यातुन flat संस्कॄतीत वाढल्यामुळे आणि आमच्या माता-पितरांना सजीव प्राणी पाळण्याची दुरान्वयेही आवड नसल्यामुळे कुत्री, मांजरी, पोपट वगैरे गोष्टींशी कधी लांबुनही संबंध आला नाही. माझ्या एक दुरच्या काकांच्या बंगल्यावर कुत्रा होता. तो बांधलेला आहे याची खात्री करुन घेतल्या शिवाय मी कधीही त्या बंगल्यात पाय ठेवला नाही. रस्त्याच्या एका बाजुनी कुत्र येताना दिसल तर मी बाजु बदलतो. पुण्यातल्या building च्या आसपास आणि नोकरीनिमित्त मुंबईत राहिलेल्या apartment च्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांड्ल्यामुळे कुत्र दिसताच हात आपसुक काठी किंवा दगड शोधायला लागतो. त्यामुळे 'कुत्र चावत नाही' , 'बर्याचदा भुंकतही नाही', 'शांतपणे शेपुट दोन पायात घालुन केस कापुन घेत' हे अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा कळल. (आईशप्पथ...माझ्या jim च्या शेजारीच कुत्र्यांच सलुन आहे. तो केस कापणारा माणुस ताशी जेव्हढे पैसे घेतो त्यात दोन software engineers बसतात अस जाणकारांच मत आहे.) इथे malls मधे खास कुत्र्यामांजरांसाठी lane, वेगळे malls, तिथे त्यांच्या माणसांच्या खाण्याएवढ्याच verities, कपडे, खेळणी, चघळायची हाड अशी थेर असतात.

तर अस एकंदरीत मामला असल्यामुळे या अचानक उद्भवलेल्या समस्येच काय करयाच या विवंचनेत पडलो. खाली वाकुन "शुक...शुक...यु...यु" असले आवज काढुन पाहिले. पण ते कुत्र अजुनच मागे सरकल. आता हे ध्वनी भाषेच्या पार आहेत अशी माझी समजुत होती. साध्या साध्या गोष्टींमधेच आपल इंग्रजी पाय घसरुन पडल्यासारख पडत असा अनुभव असल्यामुळे याचं translation करायचा विचार सोडुन दिल.भारतात असतो तर एका काठीत प्रश्न निकालात काढला असता. पण इथे बहुतेक त्या गुन्हयासाठी तुरुंगात घालत असावेत. ( आणि सहा महिने कुत्रांच्या पाळ्णघरात community service !!). म्हणुन आसपास चौकशी करण्यासाठी पायात चप्पल घालुन बाहेर पडलो. तर समोरच एक सुदॄढ युवती चेहेर्यावर स्वतः हरवल्यासारखे भाव घेऊन चालली होती. मी आमच्या घरात एक कुत्र शिरल्याच सांगताच तिनी अत्यानंदानी उडी मारली (शक्य तितकी..). मग तिला घेउन वर आलो. ( दोन जिन्यातच तिची सिंहगड चढल्यासारखी अवस्था झाली) आणी कोचाखाली कुत्र असल्याची माहिती दिली. आत ते कुत्र शेपुट हलवत बाहेर येणार आणी ही ब्याद एकदाची जाणार या आनंदात मी होतो. पण ते काही बाहेर येईना. ही खाली वाकुन 'ये रे माझ्या सोन्या ...ये रे माझ्या बबड्या ...' आणी अधुन मधुन माझ्याकडे बघुन ' sorry...मी आताच आणलीय तिला माझ्या मैत्रिणि च्या घरुन....१० दिवसच झाले..' वगैरे सांगत होती. तेव्हा ते कुत्र नसुन कुत्री आहे याचा साक्षात्कार झाला.शेवटी आवाहनाचे सर्व प्रकार अपयशी ठरल्यावर ती 'मी तिची खेळणी घेउन येते' अस म्हणुन आपल्या apartment मधे गेली. साधारण २०-२५ मिनिटांनंतर आमचे २ जिने उतरुन तिच्या building चे ३ चढुन परत आल्यावर तिची अवस्था दयनीय झाली होती. पण सवाल कुत्रीचा होता. या जागी जर तिचा boyfriend असा अडुन बसला असता तर तिथल्या तिथे तात्काळ बदलुन टाकला असता. मग तिनी त्या कुत्रीचा खेळायचा ball, चघळायच हाडुक वगैरे जमिनीवर समोर ठेवल.पण ती नतद्रष्ट कुत्री काही जागची हलेना. घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता. अप्रतिम अश्या संध्याकाळला आग लागणार हे दिसत असल्यामुळे माझ रक्त उसळत होत. समोर खायची वस्तु किंवा दुध ठेवाव अस मी १-२ दा सुचवुन पाहिल. खायची वस्तु बघुन भारतातली कुत्री नक्की बाहेर आली असती. ( कोचाखालुनच काय पण घराच्या कानाकोपर्यातुन तिन्ही त्रिकाळ उपाशी असल्यासारखी धावत आली असती. पण यावर 'आत्ताच खाण झालय तिच ..' अस मत आल. (कुत्री किती वेळा खाते यावर लक्ष ठेवता ठेवता आपण किती वेळा खातो याकडे थो..डस दुर्लक्ष झाल्यासारख वाटत होत.) आता कोचाखालची जागा बघता तिला खाली शिरायला सांगण्यात धोका होता. ती खाली अडकली असती तर ९११ call करुन fire brigade बोलवायला लागल असत. म्हणुन 'मी खाली शिरुन कुत्री बाहेर काढु का?' अस नम्रपणे विचारल. तर 'हो..कर प्रयत्न...पण ती ( म्हणजे कुत्री..) अजुन लहान आहे...she is naughty...she might bite the stranger ..." अस उत्तर आल. त्या कुत्रीनी जर मला तोंड लावल असत तर मी मुस्कटात मारली असती. ( कुत्रीच्या ...मालकिणीच्या नाही...) आणि मग भलतच लचांड मागे लागल असत (मालकिणी तर मला फुंकरिनी उडवला असता.) म्हणुन ते ऐकुन दोन पावल मागे सरकलो.

शेवटी तिच्या डोक्यात 'हा कोच आपण पुढे उचलुया' अशी idea आली (idea ...that change your life ...!!!). मग मी एक बाजुनी आणि ती दुसर्या अशा रितिनी आम्ही तो कोच उचलुन पुढे ठेवला. कुत्री आणि मालकीणी ची भरतभेट झाली. लहानपणी जत्रेत हरवलेल्या बहिणी मोठेपणी जश्या भेटतील तशी तिनी त्या कुत्री ला कवटाळल. खेळणी, हाडुक आणि कुत्री घेउन माझे आभार मानत शेवटी ती २ तासांच्या नाटकानंतर माझ्या घराबाहेर पडली.

या अनुभवावरुन सध्या मी " माणसांपासुन सावध रहा" आणि "कुत्रांना येथे शिरण्यास सक्त मनाई आहे" ह्या पाट्या English मधे कश्या लिहाव्यात या विवंचनेत आहे.

Thursday, April 30, 2009

ढेकुण२००८ सालातील सप्टेंबर - ओॆक्टोबर चे दिवस. (म्हणजे - महिन्यापुर्वीची गोष्ट ... पण अस म्हटल की वाचणारा डोळे टवकारतो आणि लक्ष देउन वाचु लागतो...!!). मी आमच्या आलिशान अपार्ट्मेंट मधे जमीनीवर अंथरलेल्या ( आणि give away sell मधुन आणलेल्या ) चादरीवर निवांत पहुडलो होतो. थोड्या वेळापुर्वी हातात घेतलेल्या assignment ने प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे ती फेकुन देउन harry potter वाचायला घेण्याचा निर्णय मी नुकताच घेतला होता. त्यामुळे सगळीकडे आनंदीआनंद पसरला होता. बाहेरच्या दिवाणखान्यात आमचा एक roommate senior कडुन आणलेल्या cot वर बैठक लाऊन बसला होता. (हा असा दिवसें दिवस बसुन राहु शकतो...). पुढे लिहिण्यापुर्वी या विषेश माणसाबद्दल लिहिण आवश्यक आहे. कारण नंतर घडलेल्या घटनांमधे याचा सिंहाचा वाटा आहे.


तर आपण ह्याच नाव नको घेउयात. मी मागेच म्हटल्याप्रमाणे परत म्हणतो .. नावात काय आहे ? आणि मला नाव घेण्यापेक्षा ठेवायला जास्ती आवडतात...तर आम्ही याला ' बापु' म्हणतो. आता पडलेल्या प्रत्येक नावाचा इतिहास काळात ख्रिस्तापर्यंत जाऊन भिडतो आणि कालांतराने लोक त्या नावाचा मुळ उद्गगाता विसरतात त्याप्रमाणे आज C304 चे रहिवासी या नावाचा इतिहास आणि मुळ कर्ता विसरले आहेत. आजही त्यावरुन C304 मधे वाद पेटत असतात. २००७ साली ऑगस्ट महिन्यात माझ्या एक दिवस आधी बापु fort collins मधे येउन डेरेदाखल झाले. ( आदरार्थी यासाठी की 'बापु' या नावाबरोबर एकार जात नाही...ते म्हणजे ' गजाननराव' अस म्हटल्यासारख वाटत...तरी कृपया गैरसमज नसावा). बरोबर British Airways च्या फक्त विद्यार्थांसाठी असलेल्या सवलतीचा फायदा घेत आणलेल्या तीन प्रचंड मोठ्या बॅगा होत्या. त्याच्यामधे सुई दोर्यापासुन ते आवळासुपारी पर्यंत यच्चयावत गोष्टी होत्या. (यानंतर British Airways नी या सवलतीचा फेरविचार सुरु केला अस समजत..). कालंतराने ते आम्हाला C304 मधे अजुन एका मनुष्यप्राण्याबरोबर join झाले. (हा दुसरा प्राणी स्वतंत्र लेखाचा विषय आहे...माझ्या आयुष्यात मी बघितलेला चमत्कार.....माणुस असाही असु शकतो...वागु शकतो...या दुनियेत काहीही अशक्य नाही...असो). बॅगेतल्या खाण्याच्या प्रत्येक वस्तुवर सु्वाच्च अक्षरात घातलेली पदार्थाच्या नावाची चिठ्ठी होती. मी यायच्या आधी अस काही करायाचा प्रयत्न केला असता तर आईनी डॉक्टर बोलवले असते. थोड्याच दिवसात बापुंचे अनेक गुण लोकांच्या लक्षात आले. संथपणे एकाच लयीत स्वयंपाकाच्या भाज्या चिरणे, mixer मधुन काढलेल्या वस्तुचा कणन् कण निपटुन घेणे, खास पदार्थांच्या recipee पासुन ते jim workout पर्यंत सर्व गोष्टींवर technical आणि logical विचार करुन ठाम मत देणे इत्यादी. एकदा दाण्याचे कुट करण्याच्या पहिल्या आणि शेवच्या प्रयत्नात मी microwave मधे दाणे भाजल्यावर खाली बसुन एक एक दाणा हातात घेउन त्याच फोलपट वेगळ करण्याचा भीमपराक्रम बापुंनी केला होता. दुसर्या वेळेला घर आवरल्यावर चपला बुट ठेवण्याच्या कोपर्यात चार लोकांसाठी चार zone करावेत असाही त्यांचा विचार होता. पण C304 मधील काही रहिवासी zone वगैरे तर सोडाच पण कोपरा सुध्दा दुर्लक्षुन सगळ्या घरात बुट घालुन मुक्तपणे हिंडत असलेले माहित असल्यामुळे मी बापुंच्या सदविचारांना आवर घातला. माझ्या दुसर्या roommate च्या मते "ये तो patience की बहुत बडी missile है और ग्यान की गंगा है " ...आणि त्याच roommate कडुन " ये तो perfect PHd material है Professor खुद बोलेगा...अब तो PHd लेले और निकल जा....". मुबलक वेळ दिला असता एका cornflakes च्या bowl साठी ४५ मिनिटे, जेवणासाठी दीड तास, आघोळीसाठी एक तास, मोजे घालण्यासाठी २० मिनिटे अशी 'timings' बापु देऊ शकतात. Ice-Cream, chocholate आणि cold drinks आवडत नसलेल माझ्या माहितितला हा एकमेव माणुस आहे. पुन्हा campus news paper detail मधे वाचणारा indian community मधला हा एकमेव इसम आहे. Fort Collins, colorado, US , india आणि rest of the wolrd इथुन येणार्या महितिचा ओघ या information gateway मधुन C304 मधे सतत वहात असतो. Tax Return पासुन car selection पर्यंत सर्व विषयांवर मोफत सल्ला बापुंकडे 24/7 उपलब्ध असतो. आणि याला स्थळ काळाच बंधन नाही. Face to face, phone, internet, video audio chat अश्या विविध माध्यमातुन बापु मित्र, नातेवाईक यांना पकडुन ज्ञानदान करत असतात. त्यामुळे आज बापूंच नाव fort collins आणि परिसरात पसरलेल आहे. बापुंचा एक फोन जाताच C304 च्या कामासाठी गाड्या हजर होतात. एरवी आम्हा बाकिच्यांना शेजरच कुत्र सुध्दा विचरत नाही.

तर असे हे बापु त्यादिवशी cot वर समाधी लावुन बसले होते. मी आतमधे harry potter च्या दुनियेत हरवलो होतो. आणि अचानक बाहेरच्या खोलीतुन मला बापुंची अस्फुट किंकाळी ऐकु आली. बापुंच्या तोंडुन आधी कधीहि ऐकलेला स्वर ऐकुन मी बाहेर धावलो. पहातो तर बापुंच्या चेहेर्यावर एखाद हिंस्त्र श्वापद पहिल्यासारखे भाव होते. हातातल्या पांढर्या कागदाकडे नजर टाकत बापु थरथरत्या आवाजात म्हणाले .." ढेकुण "...


अमेरिकेत ढेकुण ? शक्यच नाही....पण घडली गोष्ट खरी होती....जिवंत पुरावा समोर होता (बापु नाही....कागदावरचा ढेकुण). आपल्या sack वर फिरणार्या ढेकणाला बापुंनी अचुक पकडल होत. ढेकुण बघुन बापुंना त्यांचे VIT hostel मधले engineering चे दिवस आठवले. (हो..महान माणस घडवण्याची VIT ची परंपराच आहे. .दा. मी, बापु...). त्या ढेकुण भरल्या रात्री...त्याच्यापुढे submission चा त्रास काहीच नव्हता. गेल्या महिनाभर आमचा चौथा room mate रात्री काहीतरी चावतय अस म्हणत होता. पण तो अधुन मधुन "MS मधे अर्थ नाही...मी उद्याच india ला परत जाणार आहे..", "Education sector मधे business सुरु केला पाहिजे", "आता बहुते PHd करीन ....." अश्या घोषणा करत असतो. त्यामुळे आत्ता हा काहीतरी चावतय म्हणतोय , थोड्या वेळानी काहीतरी हिंडतय म्हणेल अशी शंका असल्यान तमाम जनसमुदायान तिकडे दुर्लक्ष केल होत. पण आता त्याचा उलगडा झाला.

त्यानंतर बापुंनी ढेकुण दर्शनाची द्वाही फिरवली. आणि दिवसामाशी ढेकुण वाढु लागले. आता अतिशय छोटे आणि जवळजवळ पारदर्शक असणारे ढेकुण लवकरच आपल रक्त पिऊन मोठे आणि काळे होतील अशी स्पष्ट सुचना बापुंनी दिली. त्यानंतर ढेकणांवर त्यांनी केलेल्या अचाट अभ्यासातुन प्राप्त केलेल्या ज्ञानातले आमच्यापर्यंत पोचलेले काही कण


"भिंतिंवर दिसणारे काळे ठिपके ही ढेकणंची अंडी नसुन ते त्यांनी प्यायलेले आपले रक्त्त असते."


"ढेकणांची अंडी दर तीन आठवड्यांनी फुटुन पुढची पिढी बाहेर येते."


"ढेकुण कधीच चिरडायचे नसतात तर रॉकेल मधे टाकुन मारायचे असतात." (हे ऐकुण C304 मधे घबराट पसरली. पण लगेच "Toilate मधे flush केलेत तरी चालतील " असा उःशाप दिला.)


"ढेकुन plastic च्या वस्तुंवर रहात नाहीत."


"ढेकणांची अंडी २०० C तापमानाला ला नष्ट होतात "


" १९६० साली अमेरिकेने DDT च्या मदतीनी ढेकुण समुळ नष्ट केले होते. पण नंतर DDT वर बंदी आली आणि international travel वाढल्यामुळे ढेकुन झाले." (भारतातुनच गेले असणार ...आपण सर्व जगाला software engineers आणि ढेकुण supply करतो !!)


आतापर्यंत बापुंनी कितिहि छोटा आणि पारदर्शी ढेकुण असला तरी अचुक 'spot' करुन 'flush' करणे, एखादा पांढरा ठिपका हे अंड आहे का नाही हा सल्ला देणे, ढेकुणाच्या आयुष्यातील सर्व अवस्थ ओळखणे - म्हणजे अंडी, बाल्यावस्था, तारुण्य, वृध्यपकाळ आणि मृत्यु. (एकदा त्यांनी मला खोलीच्या एका कोपर्यात बोलवुन या सर्व अवस्था एकत्र दाखवल्या होत्या)अशी बहुमुल्य skills अवगत केली होती.


पण ढेकुण आवरेनात. माझ्या चौथ्या room mate च्या अंगावर तर मोठे मोठे फोड आले. डॉक्टरांनी ही ढेकणांची alegy आहे अस सांगितल !! विविध प्रकारचे फवारे, smoke bomb नामक भयकारी चीज, संपुर्ण घरातले karpet change करणे, शेवटी desperate होऊन odomas !! असे उपाय झाल्यावर आमच्या property च्या manager बाईला शरण जायच अस ठरल.


दर महिन्याला manager company च्या वतीनी pest control चा survay सर्व घरांचा होतो. तो माणुस नेमक काय करतो ते आधि बघाव अस सर्वानुमते ठरल. या कामावर माझी नेमणुक झाली. बरोबर वेळ साधुन मी घरी थांबलो. तो माणुस घरात आला आणि त्यानी sink च्या खाली, refrigerator च्या मागेtorch नी पहिल्यासारख केल आणि तो जाउ लागला. हे त्यानी नक्कि काय केल ते मी त्याला भयंकर कुतुहलान विचारल. त्यावर त्यानी जे उत्तर दिल ते मी या जन्मात विसरणार नाही. तो म्हणाला, "आम्ही उंदीर शोधतो". सर्व प्रकारच्या कीटकांच्या जाती बाजुला ठेऊन हे paste control वाले उंदीर घरोघर जाऊन उंदीर शोधतात हे ऐकुन मी थक्क झालो. शेवटी C304 तर्फे आमच्या manager बाईंकडे C304 मधील माणसांची बाजु मांडण्यासाठी बापुंना पाठवण्यात आल.


तिनी ढेकुण आहेत यावरच संपुर्ण अविश्वास दाखवला. "तुम्ही घर साफ ठेवत नसाल....दुसरे किडे असतील" असली भाषा सुरु केली. आता हिला शिकार केलेल्या ढेकणांचे अवशेष दाखवावेत का जिवंत ढेकुण gift द्यावेत का चौथ्याला उघडा नेऊन समोर उभा करावा हा प्रश्न पडला. (म्हणजे कपडे घालुन न्यायच आणि तिथे T-shirt काढायचा...पण तो आनंदानी तसाच आमच्या room पासुन तिथपर्यंत पदयात्रा करत गेला असता.). पण बापुंनी पेशवाईतील साडेतीन शहाण्यामधील अर्धे शहाणे सखारामबापु बोकिल यांना स्मरुन मुत्सद्देपणाची कमाल करत त्या बाईला ते कीटक दुसरे तिसरे कुणी नसुन ढेकुणच आहेत हे पटवुन दिल. शेवटी तिनी orkin या अमेरिकेत ढेकुण विनाशाच काम करण्यार्या कंपनीच्या माणसाला पाठवण्याचा कबुल केल.


तो माणुस आल्यावर बापुंनी आदल्या रात्रिच्या संर्घषात मारलेल्या ढेकणाचे अवशेष दाखवले. ते पाहुन त्यानी ढेकणाच अस्तित्व मान्य केल आणि पुढील कारवाईची रूपरेखा सांगितली. आमच्या apartment बरोबरच शेजारच्या आणि खालच्या मजल्यावरच्या apartment मधे पण कारवाई होणार होती. घरातील यच्चयावत कपडे धुऊन , drier मधे वाळवणे, कपडे आणि सर्व भांडी प्लास्टिकच्या पिशव्यांमधे बंद करणे, सर्व स्थावर आणि जंगम मालमता खोलिच्या मध्यावर आणुन ठेवणे आणि तास घराबाहेर रहाणे असा कार्येक्रम होता. हा सगळा उत्सव आठवड्याच्या अंतरानी पुन्हा झाला. बापु स्वतःच लग्न असल्याच्या उत्साहात वावरत होते. Plastic च्या सर्व पिशव्यांची तोंड नुसती गाठ मारता मेणबत्तीनी बंद करावीत अशीही सुचना त्यांनी केली. पण आधीच झालेल्या मनस्तापानी पोळलेल्या जनतेने त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल.

आजही आम्ही बापुंच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत. काही कट्टर ढेकुण पुन्हा आढल्यामुळे बापुंनी orkin च्या मदतीने परत निकराच्या हल्ल्याचे संकेत दिले आहेत. ज्यादिवशी C304 मधुन शेवटचा ढेकुण देवाघरी जाईल ( किंवा आम्ही सोडुन जाऊ...त्याचीच शक्यता जास्त आहे ) तेंव्हा आमच्या parking lot मधे C304 च्या रहिवाश्यांतर्फे असीम धैर्य, साहस , commitment, patience दाखवल्याबद्दल बापुंचा शाल आणि श्रीफल देउन भव्य सत्कार करण्यात येइल. तुर्तास room च्या बाहेर "येथे Income Tax पासुन ढेकणांपर्यंत सर्व विषयांवर मोफत सल्ला मिळेल" अशी पाटी लावायचा विचार आहे. ( पाटी अर्थातच english मधे असेल .....पण एक शंका.....आजच्या घडीला california च्या bay area मधे मुंबईपेक्षा जास्त संख्येने मराठी माणुस असावा....तर california च्या bay area मधील सर्व पाट्या मराठीत असाव्यात अस आंदोलन आदरणीय राजसाहेब ठाकरे का सुरु करत नाहीत ?)