Sunday, July 5, 2015

डाएटिंग


[पुढे जाण्यापुर्वी...डाएटिंग, डाएट, डाएटिशियन असल्या आधुनिक संकल्पनांविषयी जर आपल्याला आपुलकी, कळवळा, प्रेम, आस्था असेल तर आपल्या भावना सांभाळाव्यात. त्यांना धक्का लागण्याचा संभव आहे. आता तुम्ही म्हणाल, आपण आपल्या आरोग्याविषयी बेफिकीर आहत काय ? तर तसे अजिबात नाही. आम्ही आमच्या आरोग्याविषयी अतिशय जागरुक असुन त्यामुळे अधुन मधुन एखाद्या शनिवारी दुपारी आमची झोप देखील उडते. पण डाएटच्या नावाखाली कच्चा भाजीपाल खाणे, बर्‍याचश्या गोष्टी न खाणे आणि पिणे असल्या गोष्टींची आम्हास मनापासुन चीड आहे. तेव्हा मते पटली नाहीत तरी भावना समजुन घेणे...] 

पेशव्यांच्या काळापसुन आपल्याकडे घरोघरी गणेशोत्सव साजरा होतो. [येणारे मी मुद्द्याकडे, जरा दम धरा...] त्यामुळे आमच्याही घरी साजरा होत असावा. त्याचबरोबर गणेशचतुर्थिच्या दिवशी सवाष्ण ब्राम्हण बोलावण्याचीही प्रथा आहे. तर दरवर्षी कोण नविन सवाष्ण ब्राम्हण शोधणार ? हा ऐतिहासिक प्रश्न आमच्या आजीनी शेजारील काका काकुंना दरवर्षीसाठी book करुन सोडवला आहे. पण यावर्षी ते आपल्या मुलाकडे अमेरिकेला गेल्यामुळे आयत्या वेळी लांबच्या नात्यातल्या काकुंना बोलावण्यात आले आणि आमच्या साडेसातीला सुरवात झाली. तसा मी काही जाड म्हणणार्‍यातला नाही. दहा लोकांना माझ्या अपरोक्ष विचारलतं तर सहा लोकं तरी जाड म्हणण्यापेक्षा सुद्रुढ असचं वर्णन करतील. आता नुकतच लग्न झाल्यामुळे जरा फरक पडलाय हेही खरयं. पण वस्तुस्थिती अशी आहे की अनेक वर्षांनी तुम्हाला पहाणार्‍या लोकांच्या डोळ्यावर पहिली गोष्ट येते ती तुमची तब्बेत !

गणेशचतुर्थिच्या दिवशी आमचं कुटुंब सासुबाईंना मदत करण्याच्या उद्दात हेतुनी सकाळी लवकरच माझ्या माहेरी रवाना झालं होतं. त्यामुळे सकाळी आरामात उठुन चहा-पेपर सावकाश करुन मी हलत डुलत घरी पोचलो. घराच्या दरवाज्याच्या समोरच कोचावर त्या लांबच्या काकू ठाण मांडुन बसल्या होत्या. पलिकडच्या कोपर्‍यात बायको मोदक वळत बसली होती. (माझ्या बायकोची मोदक आणि लाडु करण्याची पध्दत एकच आहे... त्यामुळे तिचे लाडु मोदकांसारखे होतात आणि मोदक लाडवांसारखे !). मी हॉल मधे शिरल्या शिरल्या त्या काकू चित्कारल्या, "चांगलीच तब्बेत सुधारलिय की ! मागच्या वेळी पाहिलं तेव्हा एवढा जाड नव्हतास !". आता मला त्यांना सांगावस वाटलं की 'काकू तुम्ही मागच्या वेळी पाहिलतं तेव्हा मी शाळेत होतो !' पण आता वेळ निघुन गेली होती. काकूंच्या धनुष्यरुपी तोंडातुन सुटलेल्या वाक् बाणानी माझ्या सारख्या निरपराधाचा हकनाक वेध घेतला होता. मी डोळ्यांच्या कोपर्‍यातुन चोरुन बायकोकडे पाहिलं. तिच्या तोंडावरचे बदलणारे रंग बघुन सरड्यानीही मान खाली घातली असती. आता मी ह्या बाईच काय वाईट केलं होतं ? तसं पाहिलं तर ह्या काकु कोचावर बसल्या तर दुसर्‍या कोणाला बसायला जागा रहात नाही. काकाबरोबर बाहेर पडल्या तर अर्धा रस्ता अडतो. काकु वजन काट्याजवळ गेल्या तरी काटा फिरायला लागेल. पण आपण पडलो सरळमार्गी. दुसर्‍याच्या वजनात न शिरणारे. त्यानंतर त्यादिवशी काय घडलं ते सांगण्यात अर्थ नाही. मोदकांचं ताट माझ्यापर्यंत पोचेना. मोदकांवर तुपाच्या धारेऐवजी थेंब पडले. बायको चिंताक्रांत चेहेर्‍यानी वावरत होती. त्यामुळे यावेळी प्रकरण बर्‍यापैकी गंभीर असावं याचा अंदाज आला. डाएटिशियन कडे जाण्याचे एक दोन प्रसंग मी खुबीने टाळले होते. पण या वेळी काही खरं दिसेना.

दुसर्‍या दिवशी ऑफिसातुन घरी आल्यावर बायको गंभीर चेहेर्‍यानी समोर बसली.
"मला तुझ्याशी थोडं महत्वाच बोलायचं आहे.."
आता हे वाक्य ऐकल्यावर पोटात जो गोळा उठतो, केलेली पापं झरझर डोळ्यासमोर सरकुन जातात आणि चेहेरा पडतो हे समदुःखी नवर्‍यांनाच समजु शकेल !
मी अवसान गोळा करुन, "बोल ना."
"उद्यापासुन आपण डाएटिंग करणार आहोत. आणि या वर चर्चा नकोय"
"हम्म.. म्हणजे नक्की काय काय ? जेवायला मिळेल ना ??.."
"फालतु विनोद नकोयत..पहिली गोष्ट.. सकाळी उठल्या उठल्या चहा नाही"
"ऑ ? चहाचा आणि डाएटिंगचा काय संबंध ? आणि तो सुध्दा सकाळचा ?? का ? कशासाठी ?" माझी बोबडी वळली..
"ऋजुता दिवेकर म्हणते की सकाळी सकाळी उपाशीपोटी चहा पिणं आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि चहात साखर असते ! "
"कोण ऋजुता दिवेकर ? तुझी मैत्रिण आहे ? तिचा काय संबंध माझ्या वजनाशी ??"
"ऋजुता दिवेकर...famous डाएटिशियन ! ती डाएटवर लिहिते.."
"मग? हल्ली काय कोणीही लिहितं...मीही लिहितो...चेतन भगत पण लिहितो..आपण का त्रास करुन घ्यायचा ??"
"करीनाची झीरो फिगर तिच्यामुळेच आहे ! तिची पुस्तकं आणली आहेत मी सगळी !"
"ऑ ? करीनाला कोट्यावधी रुपये मिळतात झीरो फिगर  करुन..मला कोण काय देणारेय ?"
"उगाच विनोद नकोयत..उद्यापासुन चहा आणि भात बंद"
"ऑ? हा अन्याय आहे..आता तर फक्त चहा म्हणालीस..आणि सकाळचा चहा ? सोडणं शक्यच नाही..मी बाकी काहीही सोडायला तयार आहे...अगदी बायकोही ! खी..खी.. "
"फालतु विनोद बासं हां..आजपासुन bread म्ह्णजे फक्त wheat bread, maggie म्हणजे आटा maggie, butter, cheese,तळेलेलं, गोड, बंद....
"दोन वेळच जेवण मिळेल ना ?..."
"मी एवढ्या गंभीर पणे सांगतेय आणि तुला फालतु विनोद सुचतायतं ?"
"तु एकदा, फक्त एकदाच तुझ्या द्रुष्टीनी वरच्या दर्जाचा विनोद करुन दाखव ना मला..."
"फालतुपणा बासं हां...बाहेरचं खाण जवळपास बंद...गेलो कुणाबरोबर तरी cheese, butter नान, मैद्याचे पदार्थ बाद.."
"    " 
"आणि दर आठवड्याला वजन करायचं आहे..."
"का? का? का? वजन काट्यापासुन तुला धोका आहे असं माझ्या कुंडलीत लिहलयं.."
"वाटेल ते बोलु नकोस...हे सगळं आपल्या physical health साठीच चाललयं ना ?"
"पण हे सगळं करताना mental health ची वाट लागली तर ती तुझी ऋजुता दिवेकर येणारे का माझ्या मदतीला ??"
"उगाच नाटकं नकोयतं...काही होत नाहीये mental health ला...मी सगळं time table केलेल आहे  उद्यापासुनचं.." आणि ती जाती झाली........

दुसर्‍या दिवशी पहाटे कधीतरी डोक्यापाशी काहितरी वाजु लागलं. बर्‍याच वेळानी बायकोनी स्वयंपाकघरातुन येऊन गजर बंद केला आणि गदागदा हलवुन उठवलं.
"चल..उठ...फिरायला जाऊन ये...ऋजुताच्या म्हणण्याप्रमाणे किमान ४० मिनिटं.."
"पहाटेचे साडे सहा वाजलेत..please झोपु दे.."
"पहाट कसली डोंबलाची साडे सहा वाजता...आणि मी उठतेच ना रोज स्वयंपाक करायला ?"
"तु महान आहेस हे मी लग्नाचा दिवशीच मान्य केलं आहे. आणि मी ऑफिसच्या बस ला laptop च ओझं घेउन चालतं जातो तेव्हा होतं चालणं"
"फालतु चर्चा बंद कर. आणि चालुन ये, नाहीतर रात्रीचं जेवण मिळणार नाही..."
"    "
त्यानंतर आठवडाभर रोज डब्यात पालेभाज्या खाऊन शेवटी बायकोचे पाय धरले तेव्हा time table मधे थोडा बदल झाला. दिवेकरांच्या पुस्तकाबरहुकुम चालु असलेल्या बाकी प्रकारांबद्द्ल बोलण्यात फारसा अर्थ नाही..५-६ वेळा थोड थोड खाणं या तत्वाखाली मिळणारे चणे फुटाणे, गायीचं दुध - तुप, बर्‍याच वेळा फक्त कच्चा झाडपाला, बिस्किटे-केक-चिप्स-कोड्रिंक्स-फास्ट फूड यांसारख्या आनंददायी गोष्टींवर संपुर्ण बंदी, कुठेही जाऊन काहीही खायचं म्ह्टलं की 'पुस्तकातल्या chart प्रमाणे यात एवढ्या कॅलरीज असतात बरं का...' ऐकाव लागतं. हे म्हणजे 'ह्यात बर्‍यापैकी विष असतं हं' असलं काहीतरी feeling येतं. 

औरंगजेबच्या झिजिया पेक्षाही जाचक असलेल्या या नियमांविरोधातला आमचा लढा अहिंसक मार्गांनी आजही चालु आहे. गांधीजी भले उपोषण, सत्याग्रह, असहकार अशी हत्यारं सांगुन गेले असतील. पण अशा परिस्थितीत यांचा काहीही उपयोग नसतो. (डाएटच्या नावाखाली उपोषण तसही चालुच असतं...).त्यामुळे चर्चा, वाटाधाटी या मार्गानी नियम शिथिल करण्याचे प्रयत्न चालु आहेत.(काय म्हणालात ?? भांडणं ?? छे छे ...तात्विक मतभेद म्हणायचं..भांडणारे आपण कोण ? समोरुन येणारे मुद्दे अनंत असतात, ते कुठुनही कुठेही जाऊ शकतात..वेळेवर भरुन न ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीचं भांडण अचानक भलत्याच बाटलीवर पोचु शकत. त्यामुळे बायकोपुढे जाताना आपली सर्व हत्यार, कवच कुंडलं शमी वृक्षावर ठेऊन परमेश्वराचरणी लीन दीन व्हावं त्याप्रमाणे जावं आणि 'यदा यदा ही धर्मस्यं..' हे श्रीकृष्ण वचन ध्यानी ठेवावं..). असो. तर चर्चेच्या बर्‍याच फेर्‍यांनंतर सकाळचा चहा चालु झाला आहेत.  अधुन मधुन बाहेरच्या खाण्यालाही परवानगी मिळते. कधी कधी आपणहुन बिस्किटे पुढ्यात येतात आणि चहा अमृतुल्य होतो !

पण तरीही असंख्य नवर्‍यांचे सुखासीन आयुष्य दुःखाच्या खाईत लोटणार्‍या ऋजुता दिवेकर समग्र ग्रंथसंग्रह दहन सोहळ्यामधे जर आपणास रस असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा !