Friday, September 25, 2009

कुत्र

मागच्याच महिन्यातली गोष्ट आहे. सोन्यासारखा शनिवार होता. आदल्या रात्री तुडुंब जेऊन, internet वर movie मघुन आरामात झोपलो होतो. सकाळ सकाळ १० वाजता जाग आली होती. मग थोड इकडे तिकडे करुन दुपारच जेऊन वामकुक्षी साठी १ च्या सुमारास लवंडल्यावर साधारण दोन अडीच तासांनी डोळे उघडले होते. चहा की आंघोळ या गहन प्रश्नावर विचार करत मी kitchen मधे उभा होतो. तेवढ्यात डोळ्याच्या एका कोपर्यातुन घराच्या उघड्या दारातुन काहीतरी पांढर आत सरकताना पाहिल. Room वरच्या बाकीच्या ३ महाभागांपैकी कोणितरी दरवाजा उघडा ठेऊन नष्ट झाला होत. जवळ गेलो तर एक छोट कुत्र आत शिरल होत. मी शक्य तितक्या चपळाईनी दरवाजा बंद करण्याच्या आत ते समोरच्या कोचाखाली गेल. वाकुन बघितल तर मोठ्याथोरल्या कोचाच्या पार टोकाला ते जाउन बसल होत.

आता अमेरिकेत 'कुत्रा' ही अतिशय मुल्यवान वस्तु आहे. आमच्या office मधे एकानी त्याच्या कुत्रांच्या जोडीला झालेली पिल्लावळ विकायला काढली होती. जन्माला आल्यापासुन ते आतापर्यंतचे त्यांचे फोटो, रंग, वजन, ती कशी खेळकर आहेत वगैरे माहिती असलेली e-mail सर्वाना पाठवली होती. नंतर प्रत्यक्ष येऊनही 'marketing' करुन डोक उठवत होता. आता डोळे फिरवणारी ती किंमत देऊन विकतच दुखण घ्यायची अजिबात ईच्छा नसल्यामुळे ( आणि already room वरचा गोंधळ प्राणिसॄष्टीलाही लाजवणारा असल्यामुळे ) त्याला मोठ्या मुश्किलिनी कटवला होता.

त्यातुन 'हरवलेली कुत्री' हे अमेरिकेत अजुनच वेगळ प्रकरण आहे. भारतात माणुस हरवला तरी कोणी विचारत नाही. "येईल परत भुक लागली की..." हे आमचा एक मित्र BSc पहिल्या वर्षाला नापास होऊन घरातुन पळुन गेल्यावर त्याच्या वडिलांनी आमच्या समोर काढलेले उदगार आहेत. (त्या मित्राच्या मते मात्र तो घरातुन 'पळुन' नव्हे तर 'निघुन' गेला होता. आता ही दोन क्रियापदे वेगळी असली तरी क्रिया एकच आहे अशी आम्हा मित्रांची तोपार्यंत समजुत होती. पण लोकसभेत पैसे खाऊन खाऊन माजलेले खासदार जसे 'भ्रष्टाचाराच्या' निषेधार्थ 'सभात्याग' करतात तसा हा नंतर होणार्या वडिलांच्या स्फोटाच्या निषेधार्थ आधीच 'निघुन' गेला असावा असा आमचा अंदाज आहे.) पण अमेरिकेत मात्र चौकाचौकात "माझा लाडका कुत्रा ... कालपासुन हरवला असुन तो या या जातीचा ...रंगाचा ...उंचीचा आहे. शोधुन देण्यार्यास योग्य बक्षिस देण्यात येइल." आणि याच्या वरती फोटो... अशी पत्रक आढतात. एका मधे तर खाली 'तु कुठे निघुन गेलास ? लवकर परत ये.. असही व्याकुळ आवाहन होत. ( फक्त ..बाबा आजारी आहेत. आईनी अन्न पाणी सोडल आहे..याची कमी होती.) परवा आमच्या building च्या खाली एक कुत्र सापडल्याची आणि कोणाच असल्यास घेउन जाण्याची सुचना देणारी notice लावली होती. त्यामधे 'या कुत्र्याच्या गळ्यात नावाची चिठ्ठी नसल्यामुळे ओळख पटवण्यासाठी प्रश्नोत्तरांचा कार्येक्रम करावा लागेल अशीही सुचना होती. म्हणजे मालकाला कंटाळुन ते कुत्र घरातुन 'निघुन' आल तरी त्याच्या नशिबी स्वातंत्र्य नाही. कारण 'भटकी कुत्री' ही जमात अमेरिकेत अस्तित्वात नाही. ती आपली राष्ट्रीय संपत्ती आहे.

त्यातुन flat संस्कॄतीत वाढल्यामुळे आणि आमच्या माता-पितरांना सजीव प्राणी पाळण्याची दुरान्वयेही आवड नसल्यामुळे कुत्री, मांजरी, पोपट वगैरे गोष्टींशी कधी लांबुनही संबंध आला नाही. माझ्या एक दुरच्या काकांच्या बंगल्यावर कुत्रा होता. तो बांधलेला आहे याची खात्री करुन घेतल्या शिवाय मी कधीही त्या बंगल्यात पाय ठेवला नाही. रस्त्याच्या एका बाजुनी कुत्र येताना दिसल तर मी बाजु बदलतो. पुण्यातल्या building च्या आसपास आणि नोकरीनिमित्त मुंबईत राहिलेल्या apartment च्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांड्ल्यामुळे कुत्र दिसताच हात आपसुक काठी किंवा दगड शोधायला लागतो. त्यामुळे 'कुत्र चावत नाही' , 'बर्याचदा भुंकतही नाही', 'शांतपणे शेपुट दोन पायात घालुन केस कापुन घेत' हे अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदा कळल. (आईशप्पथ...माझ्या jim च्या शेजारीच कुत्र्यांच सलुन आहे. तो केस कापणारा माणुस ताशी जेव्हढे पैसे घेतो त्यात दोन software engineers बसतात अस जाणकारांच मत आहे.) इथे malls मधे खास कुत्र्यामांजरांसाठी lane, वेगळे malls, तिथे त्यांच्या माणसांच्या खाण्याएवढ्याच verities, कपडे, खेळणी, चघळायची हाड अशी थेर असतात.

तर अस एकंदरीत मामला असल्यामुळे या अचानक उद्भवलेल्या समस्येच काय करयाच या विवंचनेत पडलो. खाली वाकुन "शुक...शुक...यु...यु" असले आवज काढुन पाहिले. पण ते कुत्र अजुनच मागे सरकल. आता हे ध्वनी भाषेच्या पार आहेत अशी माझी समजुत होती. साध्या साध्या गोष्टींमधेच आपल इंग्रजी पाय घसरुन पडल्यासारख पडत असा अनुभव असल्यामुळे याचं translation करायचा विचार सोडुन दिल.भारतात असतो तर एका काठीत प्रश्न निकालात काढला असता. पण इथे बहुतेक त्या गुन्हयासाठी तुरुंगात घालत असावेत. ( आणि सहा महिने कुत्रांच्या पाळ्णघरात community service !!). म्हणुन आसपास चौकशी करण्यासाठी पायात चप्पल घालुन बाहेर पडलो. तर समोरच एक सुदॄढ युवती चेहेर्यावर स्वतः हरवल्यासारखे भाव घेऊन चालली होती. मी आमच्या घरात एक कुत्र शिरल्याच सांगताच तिनी अत्यानंदानी उडी मारली (शक्य तितकी..). मग तिला घेउन वर आलो. ( दोन जिन्यातच तिची सिंहगड चढल्यासारखी अवस्था झाली) आणी कोचाखाली कुत्र असल्याची माहिती दिली. आत ते कुत्र शेपुट हलवत बाहेर येणार आणी ही ब्याद एकदाची जाणार या आनंदात मी होतो. पण ते काही बाहेर येईना. ही खाली वाकुन 'ये रे माझ्या सोन्या ...ये रे माझ्या बबड्या ...' आणी अधुन मधुन माझ्याकडे बघुन ' sorry...मी आताच आणलीय तिला माझ्या मैत्रिणि च्या घरुन....१० दिवसच झाले..' वगैरे सांगत होती. तेव्हा ते कुत्र नसुन कुत्री आहे याचा साक्षात्कार झाला.शेवटी आवाहनाचे सर्व प्रकार अपयशी ठरल्यावर ती 'मी तिची खेळणी घेउन येते' अस म्हणुन आपल्या apartment मधे गेली. साधारण २०-२५ मिनिटांनंतर आमचे २ जिने उतरुन तिच्या building चे ३ चढुन परत आल्यावर तिची अवस्था दयनीय झाली होती. पण सवाल कुत्रीचा होता. या जागी जर तिचा boyfriend असा अडुन बसला असता तर तिथल्या तिथे तात्काळ बदलुन टाकला असता. मग तिनी त्या कुत्रीचा खेळायचा ball, चघळायच हाडुक वगैरे जमिनीवर समोर ठेवल.पण ती नतद्रष्ट कुत्री काही जागची हलेना. घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता. अप्रतिम अश्या संध्याकाळला आग लागणार हे दिसत असल्यामुळे माझ रक्त उसळत होत. समोर खायची वस्तु किंवा दुध ठेवाव अस मी १-२ दा सुचवुन पाहिल. खायची वस्तु बघुन भारतातली कुत्री नक्की बाहेर आली असती. ( कोचाखालुनच काय पण घराच्या कानाकोपर्यातुन तिन्ही त्रिकाळ उपाशी असल्यासारखी धावत आली असती. पण यावर 'आत्ताच खाण झालय तिच ..' अस मत आल. (कुत्री किती वेळा खाते यावर लक्ष ठेवता ठेवता आपण किती वेळा खातो याकडे थो..डस दुर्लक्ष झाल्यासारख वाटत होत.) आता कोचाखालची जागा बघता तिला खाली शिरायला सांगण्यात धोका होता. ती खाली अडकली असती तर ९११ call करुन fire brigade बोलवायला लागल असत. म्हणुन 'मी खाली शिरुन कुत्री बाहेर काढु का?' अस नम्रपणे विचारल. तर 'हो..कर प्रयत्न...पण ती ( म्हणजे कुत्री..) अजुन लहान आहे...she is naughty...she might bite the stranger ..." अस उत्तर आल. त्या कुत्रीनी जर मला तोंड लावल असत तर मी मुस्कटात मारली असती. ( कुत्रीच्या ...मालकिणीच्या नाही...) आणि मग भलतच लचांड मागे लागल असत (मालकिणी तर मला फुंकरिनी उडवला असता.) म्हणुन ते ऐकुन दोन पावल मागे सरकलो.

शेवटी तिच्या डोक्यात 'हा कोच आपण पुढे उचलुया' अशी idea आली (idea ...that change your life ...!!!). मग मी एक बाजुनी आणि ती दुसर्या अशा रितिनी आम्ही तो कोच उचलुन पुढे ठेवला. कुत्री आणि मालकीणी ची भरतभेट झाली. लहानपणी जत्रेत हरवलेल्या बहिणी मोठेपणी जश्या भेटतील तशी तिनी त्या कुत्री ला कवटाळल. खेळणी, हाडुक आणि कुत्री घेउन माझे आभार मानत शेवटी ती २ तासांच्या नाटकानंतर माझ्या घराबाहेर पडली.

या अनुभवावरुन सध्या मी " माणसांपासुन सावध रहा" आणि "कुत्रांना येथे शिरण्यास सक्त मनाई आहे" ह्या पाट्या English मधे कश्या लिहाव्यात या विवंचनेत आहे.

2 comments:

Yawning Dog said...

ashakyaa, hugely hilarious.
Sahee lihile ahes re :D

Anonymous said...

मस्त.....तुझ्या ईतर पोस्टप्रमाणेच हे देखील आवडले...’बॉयफ्रेंड असता तर तिने जागच्या जागी बदलला असता पण प्रश्न कुत्र्याचा होता...’ सही!!!!

Tanvi