Friday, January 29, 2010

न्हावी

साधारण २-३ वर्षांपुर्वी कधितरी अमेरिकेत आलो असेन. (ok. ३००-४०० वर्षांपुर्वी शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा नेमका कोणत्या दिवशी काढला एवढी जुनी आणी अवघड तारीख नाहीये ती. जिज्ञासुंसाठी ऑगस्ट २००७ ला आलो.) या आधीच्या आमच्या सर्व शिक्षित पिढ्यांपैकी शिकण्यासाठी पुण्याबाहेर पाऊल कुणीही टाकल नव्हत. त्यामुळे यायच्या आधी प्रश्नच प्रश्न डोक्यात होते. MS कशाशी खातात ? 'course register' करायचे म्हणजे नेमक काय करायच ? Funding नावाची वस्तु कुठे मिळते ? ( यासाठी भिक्षेकर्याच सोंग घेऊन दारोदार भटकाव लागत हे नंतर कळल.) आणी हे सगळ गरज पडली तर English मधे लोकांना कस विचारायच ? यासारखे प्रश्नासुर समोर उभे होते. अशा अभुतपुर्व गोंधळात पहिली semester सुरु झाली. त्यातुन 'भिक्षेची झोळी' रिकामीच असल्यामुळे university च्या kitchen मधे कामाला सुरवात केली होती. यात ३-४ महिने निघुन गेले. एका दिवशी सकाळी आंघोळीनंतर भांग पाडताना 'आपले केस वाढले आहेत' याचा साक्षात्कार झाला. घरी जरा केस वाढले की 'अरे केस कापुन ये आता तरी ...' असा आरडाओरडा आई-आजी सुरु करायच्या.इथे ती सोय नव्हती. म्हणुन नाईलाजाने येण्यार्या शनिवार रविवारी केस कापावेत अस ठरवल. College ला जाताना घराच्या कोपर्यावरच एक सलून सारख वाटणार दुकानही लक्षात होत.
मग शनिवारी सकाळी ९-१० च्या सुमारास अर्धवट झोपेत पायात चपला चढवुन त्या दुकानात जाऊन बसलो.समोर receptionist होती. पण अजुनही झोपेचा अंमल कायम असल्यामुळे ती receptionist, आजुबाजुची चकाचक डोक्यात उतरत नव्हती.आपला नंबर आला की बोलावतील या आशेवर बसुन होतो. आजुबाजुला थोडीफार गडबड दिसत होती.थोड्या वेळानी एक मध्यमवर्गीय बाई आत शिरली आणी थेट receptionist कडे गेली. तिथे त्यांची थोडी गुफ्तगु झाल्यावर तिने त्या बाईंना सन्मानान आत नेऊन बसवल. ही बाई रांग मोडुन कशी घुसली ? हा संतापजनक प्रश्न डोक्यात येत जात असतानाच त्या receptionist नी माझ्याकडे येऊन 'Do you have appointment ? ' अस गोड आवाजात विचारल. या प्रश्नानी डोळ्यावरची झोप खाडकन उतरली आणी आपण सलुन सोडुन dentist च्या दवाखान्यात तर घुसलो नाही हे तपासण्यासाठी मी आजुबाजुला नजर फिरवली.पण ते सलुनच होत. चारी भिंतिंवर वेगवेगळ्या brands ची hair products, posters आणी doctor सारखा एप्रन घालुन केशकर्तन करणार्या बहुतांशी बायका आणी तुरळक पुरुष !! . 'Appointment नाही' अस मी तिला सांगताच, आम्ही फक्त appointment नीच haircut करतो आणी पुढचे ३-४ दिवस भरलेले आहेत ही कुवार्ता दिली. सोन्यासारखा शनिवार असल्यानी डोक्याला फारसा त्रास न देता 'मी नंतर फोन करुन appointment घेईन ' अस सांगुन बाहेर पडलो.
काही 'अनुभवी' लोकांना विचारल्यावर, 'इथे अशीच पध्दत आहे' आणी appointment शिवाय केशकर्तन कमी ठिकाणी असत अस कळल्यावर, ' कशाला या भानगडीत पडा ?, सरळ केस वाढवुन ponytail बांधुया असा विचार मनात आला. पुढच्याच फोनवर घरी आईला हे सांगताच आमच्या मातेनी , 'तु तश्या अवस्थेत परत ये...मी तुला घरात काय building मधेही घेणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे appointment घेण आल. आता या आधी कधी doctor चीही appointment घेतली नव्हती. लहानपणापासुन काही दुखल्या खुपल्यास family डॉक्टरांसमोर जाऊन उभ रहायच. त्यांनी दिलेल लाल औषध ( थोड मोठ झाल्यावर पांढर्या गोळ्या ) घेतल्या की जगातले सर्व रोग बरे होतात हा विश्वास होता. त्यामुळे १० वी च्या इंग्रजीच्या डाके सरांच नाव घेऊन फोन लावला. डोक करायची appointment पाहिजे अस सांगितल्यावर 'कोणाची देऊ ? Anybody favorite ? याआधी आमच्या इथे कोणाकडे appointment घेतली होतीस ?' हे प्रकरण इतक complicated असेल याची खरच कल्पना नव्हती. मग 'माझ कोणी favorite नाही. मी तुमच्या इथे पहिल्यांदाच केस कापुन घेतो आहे.' हे तिला समजावुन दिल. ते ऐकल्यावर 'ok. मग मी तुला Lisa ची appointment देते. वेळेवर ये. उशीर झाला तर आम्ही appointment cancel करतो' अशी धमकीही वर दिली.
ठरलेल्या दिवशी दिलेल्या वेळेच्या आधीच तिथे जाऊन बसलो. आधीचा customer गेल्यावर receptionist नी मला Lisa च्या खुर्चीकडे पाठवल. तिथे गेल्यावर त्या Lisa नी तोंडभरुन हास्य केल. आमची साता जन्माची ओळख आहे आणी आम्ही लहानपणी बालवाडीत फुगडी खेळायचो अश्या थाटात सुरवात केली. "Welcome. How are you today ? Let me take your coat. Please have a seat..."
या अनपेक्षित स्वागतान गांगरुन जाऊन मी त्या खुर्चीवर अवघडुन बसलो. 'ह्या सगळ्या स्वागताचे किति पडतील ?' हा प्रश्न डोक्यात वळवळत होताच. सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यावर माझ्याकडे बघत तिनी विचारल
"So, what you want to do today ? "
..ऑं ?? ( उटण लावुन आंघोळ !!! जमेल ?? )
न्हाव्याकडे केस कापणे आणी दाढी ही दोनच काम होतात अशी माझी समजुत होती.
आता हिला नेमक काय सांगायच अश्या संभ्रमावस्थेत काही सेकंद गेल्यावर ' मला फक्त केस कापायचे आहेत. बस्स.' हे समजावुन सांगितल. ते कळल्यावर प्रयोगशाळेत फिरत्या टेबलावर प्रयोगासाठी ठेवलेल्या उंदराला फिरवाव तशी ती खुर्ची फिरवत माझ्या डोक्याकडे बघत पुढचा प्रश्न केला,
"किती इंच केस ठेवायचेत तुला ?"
खर सांगतो, ती ' तु देशस्थ ॠग्वेदी ब्राम्हण दिसतोस ' म्हणाली असती तरी मी जितका दचकलो नसतो तितका या प्रश्नानी दचकलो.
किती इंच केस ठेवायचेत ? या प्रश्नाच उत्तर कस शोधायच हे आजतागायत मला उमगलेल नाही. अंदाजच करायचा झाला तर साधारणपणे अशी procedure असावी. आधी घरी फुटपट्टनी आपले वाढलेले केस मोजायचे. मग आरश्यासमोर ध्यान लावुन किती इंचाचे केस आपल्या रुपड्याला शोभुन दिसतील यावर गहन विचार करायचा. तो आकडा ठरला की इयता २ मधल गणित पणाला लावुन पहिल्या अंकातुन दुसरा अंक वजा करायचा.मग तो आकडा आपल्या वहीत टिपुन घेउन खुर्चीवर बसल्यावर तिच्या तोंडावर फेकायचा. या खुर्चीवर पोचे पर्यंत कराव्या लागलेल्या धकाधकीनी माझ डोक आधीच शिणल होत. त्यामुळे 'बाईग, तुला माझ्या डोक्याच काय करायचय ते कर, फक्त माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस' अस सांगाव असा एक विचार मनात आला.पण मग नंतर होण्यार्या परिणामांनाही सामोर जाव लागल असत. म्हणुन 'medium करा. side नी कमी.' या भारतीय न्हाव्याला देण्यात येण्यार्या आदेशाच ईंग्रजीत रुपांतर करत करत, इंच इंच लढवत शेवटी ते केशकर्तन शेवटाला नेल. बोटाच्या पेरांनी लांबी मोजत, अर्धा मिलिमिटर जरी एकडेतिकडे झाल तरी जणु तिला अफगाणिस्तानात तालिबान्यांचे केस कापायला पाठवल जाईल अश्या भितीनी घाबरत विचारत तिनी माझ डोक भादरल. या सगळ्या प्रक्रियेच output आरशात बघुन आणि भारतातल्या पंचवार्षिक केशकर्तनाइतक बिल चुकत करुन, 'come again' च्या डागण्या सोसत तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडलो.
घराकडे परत चालत येताना आमचा शंकर न्हावी डोळ्यासमोर उभा राहिला. पत्र्यामरुतीच्या समोर त्याच पिढीजात सलुन आहे. माझ्या आजोबांच, नंतर माझ्या वडिलांच आणि माझ अश्या तीन पिढ्यांची डोकी त्याच्या हाताखालुन गेली. त्याला किंवा आपल्या कुठल्याच न्हाव्याला हे इंचाबिंचाचे प्रश्न कधी पडलेच नाहीत. लहानपणी केस वाढल्यावर आजोबा हाताला धरुन त्याच्यासमोर बसवायचे आणी ' एकदम कमी कर रे...म्हणजे २ महिने बघायला नको' असा आदेश द्यायचे. नंतर नंतर तर त्याला काही सांगावच लागायच नाही. खुर्चीवर बसल्यावर काही न विचारता तो कात्री आणी तोंडाचा पट्टा सुरु करायचा ते थेट केस कापुन संपेपर्यंत.
आधीच्या अनुभवानी पोळल्यामुळे मी पुढच्यावेळी दुसर्या सलुन मधे जायच ठरवल. एक दिवस उशीरा संध्याकाळची appointment घेऊन दुसर्या बाई समोर बसलो. आधीच्या ठेचेन आलेल चमचाभर शहाणपण वापरुन इंचाचे आकडे कुशलतेने ( माझ्या मते...) पेरत तिला समजावुन सांगितल. आता मागच्या प्रमाणे मोजत, घाबरत, विचारत गाडी चालणार आणी आपण हवे तसे केस कापुन घेऊ या आनंदात मी होतो. पण ते ऐकल्या ऐकल्या तिनी मला काहीही न विचारता आणी बोलायची एकही संधी न देता कात्री, कंगवा आणी विविध clippers वापरुन माझ्या डोक्याची कापणी केली आणी आरसा समोर धरला. ( नंतर वट्ट डोलर्स मोजुन घेतना 'अरे, फारच चटकन झाला की तुझा haircut, आता मला लवकर सलुन बंद करता येईल' हे ऐकवल..)

पण आता मी निर्ढावलो आहे. घरचच सलुन आणी घरचाच न्हावी असल्याच्या आत्मविश्वासात त्या खर्चीवर बसुन इंचाच्या गप्पा मारत अपेक्षित haircut करुन घेण्याइतक ईंग्रजी सुधारल आहे. नेहेमिच्या सलुन मधला haircut करणारा Peter ओळखीचा झाला आहे.शेवटी मी एकदा त्याला अनेक दिवस पोटात डचमळणारा अस्सल घाटी प्रश्न विचारुन टाकला. 'किती सुट्तात हो महिन्याचे ??' . मिळालेल्या आकड्याच्या धक्क्यातुन मी अजुनही सावरतो आहे आणी याअमेरिकन लोकांची software लिहिण्यापेक्षा त्यांची पाण्यानी वा बिनपाण्यानी करण जास्त फायदेशीर आहे या निष्कर्षाला पोचलो आहे !!.
8 comments:

हेरंब said...

हा हा .. एकदम मस्त लिहिलंयस..

Shashank said...

एकदम भारी लिहीले आहे. खुर्चीवरच गडाबडा लोळुन हसुन झाल्यावर प्रतिक्रीया देतोय. ;)

निरंजन कऱ्हाडे said...

सौरभ, झक्कास झाला आहे लेख! वाचून मजा आली :)

Sagar said...

Khup chan zala aahe lekh...Maja aali vachatana.....

सौरभ said...

धन्यवाद !!...pls do read my other posts also..Enjoy !

व्हीके said...

तुला हे लिहिण्याकरता युएसला जावे लागले. छानच लिहिले आहे. पूर्ण वाचावाच लागला. हा प्लस पॉंईंट.

Tushar said...

maja aala sala!!!!....ek no!!!

Jyoti said...

tumchi writing style khupach chan ahe