Sunday, June 6, 2010

काहीबाही

आज थोड नॉस्टॅल्जिक झाल्यासारख होतय. अस होत कधी कधी. एखाद जुन पुस्तक परत हातात घेतल जात, internet वर भटकताना एखाद गाण लागत, कवितेची ओळ सापडते, बातमी उघडली जाते आणी कशाचा कशाला संबंध नसलेल्या आठवणी फसफसुन वर येतात. आज महाराष्ट्र टाईम्स च्या site वर सुनीताबाई देशपांड्यांच्या निधनाची बातमी सापडली आणी पु.ल.-सुनीताबाई, त्यांची पुस्तकं, नाटकं, माझे शाळा-कॉलेजातले दिवस अशी फरफट निघाली.
१२ जुन २००० ला पु.ल. गेले. ज्यांच्या पुस्तकांनी मराठी वाचनाची गोडी लावली, निखळ निर्विष विनोद म्हणजे काय ते शिकवल, 'रसिकता' या शब्दाचा अर्थ जगुन दाखवला अश्या लेखकाला एकदा तरी प्रत्यक्ष बघाव अशी इच्छा होती. दुर्दैवानी ती पुर्ण झाली नाही. पु.ल.च्या पुस्तकांनी जे विश्व उभ केल त्याच्या जवळपास विरुध्द टोकाच लिखाण सुनीताबाईंनी केल.अवघी ४-५ पुस्तक लिहुन, पु.ल. सारख्या लेखकोत्तमाच्या छायेत राहुन, मराठी साहित्यात स्वतःच एक स्थान निर्माण करणार्या त्या लेखिका होत्या. त्यांच्या स्वभावासारखीच त्यांची सडेतोड आणी निर्भिड लेखणी, मराठी कवितांवरच निरातिशय प्रेम, गांधीवादी विचार जगुन दाखवण्याची धडपड, जी. ए. सारख्या लेखकांच्या लेखकाशी असलेली अमुल्य मैत्री, संगीत नाटक साहित्य सिनेमातील दिग्गजांशी जमलेला स्नेह आणी पु.ल.ना त्यांनी दिलेली समर्थ साथ हे सगळ पाहिल की अचंबित व्हायला होत. मागच्या वर्षी नोव्हेंबर मधे त्या गेल्या आणी महाराष्ट्राच्या सांस्कॄतीक पटावरच्या एका फार मोठ्या आणी कधिही विस्मॄतीत जाउ न शकणार्या पर्वावर पडदा पडला. पु.ल.च्या त्यांच्याकडे असलेल्या नाटकांचे हक्क त्यांनी सर्वांसाठी खुले केले. आता या नाटकांच्या प्रयोगासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. तसेच त्यांच्या सर्व पुस्तकांचे आणी त्यांच्याकडे असलेल्या पु.ल.च्या पुस्तकांचे हक्क त्यांनी पुण्याच्या आयुका या संस्थेला दिले. पु.ल.देशपांडे फाउंडेशनच्या माध्यमातुन अलिप्तपणे या दोघांनी अनेक संस्थांना लाखांची मदत केली. समाजाकडुन जे मिळाल ते सर्वच्या सर्व समाजाला परत देउन स्वतःसाठी एक कपर्दिकही न ठेवता हे जोडप निघुन गेल. एका सुंदर आणी आदर्श सहजीवनाची सांगता झाली.
गेल्या काही वर्षात सुनीताबाई, विंदा, ग.प्र.प्रधान या सारखी काही फार मोठी व्यक्तीमत्व आपल्यातुन निघुन गेली. गांधीवादी, समाजवादी विचारसरणीकडे झुकलेली, मुल्य तत्वांना धरुन जगलेली, सामाजिक भान असलेली...आज आजुबाजुला कोसळणारी मुल्यव्यवस्था बघितल्यावर त्यांच जाणं प्रकर्षानी जाणवत. ते मोठे साहित्यिक होते यात वादच नाही. पण त्यांनी जगुन दाखवलेली विचारसरणीही तितकिच महत्वाची होती. होती ? का आजही आहे ? काळाच्या संदर्भात मुल्यांचे अर्थ बदलतात का ? का आजुबाजुच्या परिस्थितीच्या संदर्भात आपणच ते लावायचे असतात ? माहित नाही.

No comments: