Monday, June 14, 2010

मित्र


मागच्या पुण्याच्या भेटीत शाळेच्या भागात जाण्याचा योग आला. अप्पा बळवंत चौकातली ही नावाजलेली जुनी शाळा. यंदाच शाळेच शतकोत्तर अमॄत महोत्सवी वर्ष होत. ह्याच शाळेत माझ शालेय शिक्षण झाल. 'शिक्षण झाल' म्हणण्यापेक्षा मी या 'शाळेत होतो' अस म्हणण जास्त बरोबर ठरेल. 'शाळेत शिक्षण मिळत' यावर शाळेनी कधीही विश्वास बसु दिला नाही. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांच्या घरी शिकवणीला जाऊन मी 'सुशिक्षित' झालो.

एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन वसलेल्या पुणेरी पेठांच्या मध्यवर्ती भागात आमची शाळा असल्यामुळे तिथे येण्यार्या अठरापगड जातीच्या विद्यार्थ्यांना एक विशिष्ट 'character' होत. त्यातुन पापभिरु, मध्यमवर्गीय घरातुन आल्यामुळे आणी अभ्यासात थोडीफार गती असल्यामुळे सगळ शालेय जीवन A ते F या उतरंडीतल्या A-B वर्गात गेल. त्यामुळे जे मित्र भेटले तेही 'खानदानी पेठी'. पुढे यथावकाश जिवाच्या करारानी १० वी पास झालो.त्यानंतर अनेक मित्रांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण माज, खत्रुडपणा, एकमेकांची उणीदुणी काढत कुचाळक्या करणे अश्या समान गुणांमुळे सहा सात महाभागांची संगत सुटली नाही. नंतर दिवस गेले. (म्हणजे काळ उलटला...). पदव्या मिळाल्या. लोकांच्या आवडीनिवडी, खाण्या'पिण्याच्या' सवयी, बसण्याच्या जागा बदलल्या.कॉलेजात असताना जे खुप काही 'कर्तुत्व' दाखवतील अस वाटल होत त्यांनी काहीच केल नाही. जे काहीच करण शक्य नाही अस वाटत होत त्यांनी खुप 'कर्तुत्व' दाखवल. आतापर्यंतच्याया या वाटचालीत सांगण्यासारख्या खुप घटना आहेत. पण लिहिण्यासारखी एकच !!. पुढची कथा सांगण्यापुर्वी कथेतील पात्रांची थोडी तोंडओळख गरजेची आहे.
आमच्या group मधे मी धरुन एकंदरीत ८ लोक. दीड doctor ( 1 MBBS आणी 1 BAMS आयुर्वेद यांची बेरीज २ न होता दीड होते अस आमच मत आहे.), २ चुकार MBA, 3 दीनवाणे engineer आणी एक भाssऊss...भाऊ म्हणजे... पुण्यात भाऊ असतो.तसला भाऊ.या भाऊ लोकांच्या काही खास 'chaaractoristics' असतात.ही लोक नेहेमी धंदा करतात. नोकरी सारख्या अपमानास्पद गोष्टीची यांना चीड असते.हा धंदा कुठलाही असु शकतो. गोडतेल विकण्याच्या agency पासुन ते foreign exchange पर्यंत काहीही. यांच्याकडे सदैव काही ना काही 'schemes' असतात - अगदी कमी bill येणार्या Tata च्या फोन पासुन ते अर्ध्या किंमतितल्या flat पर्यंत. ह्यांच्या सगळीकडे ओळखी असतात. फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावण्यापासुन ते पोलिसानी उचलेली गाडी सोडवण्या पर्यंत सगळीकडे ह्यांची 'माणस' असतात. तर असा 'original' भाऊ आमच्याकडे आहे. याचा jim आणी swimming pool maintenance चा धंदा आहे. BAMS doctor हा पारंपारीक वैद्यांच्या खानदानातला, सकाळी थोडी practice, दुपारी झोप, संध्याकाळी जमल तर दवाखाना आणी रात्री तोंडाची गटारगंगा मोकळी करायला कट्ट्यावर वारी असा पुणेरी धंदा करणारा वैद्य आहे. MMBS doctor च्या जीवनावर वेगळ पुस्तक लिहाव लागेल. B.J.Medical सारख्या college ला admission मिळाल्यावर तिथे सर्व 'उद्योग', 'धंदे' , नाटक-तमाशे, करुन फावल्या वेळात doctor की शिकलेल हा doctor आहे. नुकतच याच लग्न झाल. या लग्नाच्या 'inception to implementation' या प्रवासाच्या चित्तरकथेची तुलना फक्त राखी सांवतच्या TV वरच्या स्वयंवराशीच होऊ शकेल. पण आपण जस गेलेल्या माणसांविषयी वाईट बोलत नाही तस लग्न झालेल्या मित्रांच्या पुर्वायुष्याविषयी न बोलण्याचा आमच्याकडे अलिखित नियम आहे. आमच्याकडे एक ' मोठा माणुस' ही आहे. हा college च्या पहिल्या वर्षाला घरातुन पळुन गेला होता. सगळी मोठी माणस लहानपणी घरातुन पळुन जातात. ( हे यानीच आम्हाला नंतर सांगितल...). पण याच्या मते हा घरातुन 'पळुन' नाही तर 'निघुन' गेला होता. आता ही दोन क्रियापद वेगळी असली तरी क्रिया एकच आहे अशी तोपर्यंत आमची असमजुत होती. पण 'मोठ्या माणस' निघुन जात असावीत आणी फुटकळ छोटी माणस पळुन जात असावीत असा काहीसा फरक असावा अशी आम्हाला शंका आहे. ही प्रमुख पात्र सोडता बाकीची लोक माझ्यासारखी सरळ आणी सज्जन आहेत.
Group च्या भेटण्याच्या जागांमधे झालेले बदलही लक्षणीय आहेत. बालगंधर्व पुल, गंधर्व हॉटेल, शारदा center समोरच दक्षिणी, z bridge खालची चौपाटी, S.P. college समोरची chinese ची टपरी, हॉटेल विश्व असे बदल होत गेले.हे होता होता काळ बदलला. CCD नामक ४०-५० रुपायांन भिकार coffee विकणार्या जागा पुण्यात कुत्राच्या छ्त्र्यांसारख्या उगवल्या. आता या सगळ्याची नेमकी सुरवात कशि आणी कुठे झाली माहित नाही. हल्ली पुण्यात शिल्लक राहिलेल्या या ८ पैकी ५ तिरकस डोक्यातल्या नेमक्या कोणत्या डोक्यात कल्पना आली हे सांगण कठीण आहे. पण काही अनाकलनीय कारणांमुळे या लोकांना CCD मधे बसुन 'UNO' नामक लहान मुलांचा पत्त्यांसारखा खेळ खेळण्याची आवड निर्माण झाली.भाऊची jim असलेल्या building च्या बाहेरच CCD झाल होत. त्यामुळे 'भाssऊss..आपलच आहे...' या आपलेपणाच्या भावनेतुन लोक तिथे बसुन UNO खेळु लागली. अधुन मधुन coffee घेत असल्यामुळे CCD वाल्याचीही काही हरकत नव्हती. आणी शेवटी काही झाल तरी तो भाऊ चा माणुस होता.
असाच एक दिवस संध्याकाळी खेळ रंगात आला होता. लोकांना वेळाकाळाच भान राहिल नव्हत. शब्दाशब्दी, बाचाबाची अस सगळ यथासांग सुरु होत. बर्याच वेळानी MBBS doctor नी घरी जाण्याचा निर्णय जाहीर केला. बाकीच्यानी एकच डाव खेळण्याचा त्याला खुप आग्रह केला. पण लहानपणापसुनच हुशार असल्यामुळे, 'कुठे थांबायच' हे कळत असल्यामुळे, तो आग्रहाला बळी न पडता निघुन गेला. बाकीच्या जनतेनी 'शेवटच्या डावाला' सुरवात केली. नेहेमी प्रमाणे आरडाओरडा, शाब्दिक चकमकी यांना उत आला होता. या सगळया गोंधळात एक माणुस शेजारी उभा राहुन लक्षपुर्वक खेळ बघतो आहे हे कोणाच्याच ध्यानात आल नाही. थोड्या वेळानी त्यानी विचारल, " हे काय चाललय ?" कोणीतरी अभिमानानी उत्तर दिल, "UNO खेळतोय !." २ मिनिट विचार करुन रस्त्याकडे हात दाखवत तो चढ्या आवाजात म्हणाला, "चला...."."ओ ..काय झाल ? काय problem आहे..." असले शब्द बाहेर पडायच्या आत कोणाच तरी लक्ष रस्त्यावरच्या तो दाखवत असलेल्या गाडीकडे गेल. ती पांढरी जीप होती. वर लाल बत्ती होती आणी 'पोलीस' अस लिहिलेल होत.थिजलेल्या डोक्यानी आणी जड पायांनी आजुबाजुच्या गर्दी समोर सगळे 'खेळाडु' जीप मधे बसले. जीप सुरु झाली आणी आतल्या हवालदारानी प्रश्न विचारायला सुरुवत केली. वानगीदाखल एक संवाद खाली देत आहे,

"चांगल्या घरातली मुल दिसताय तुम्ही...आणी हे काय लावलय जुगार वगैरे ?.."
"अहो तो जुगार नाही हो..."
"मग काय हाय ?"
"UNO आहे.."
"काये ??"
"UNO...ते पत्त्यासारख असत ..एक्क , दुर्रि, तिर्रि वगैरे...राजा गुलामाच्या ऐवजी ही दुसरी पान असतात..."
"हां...म्हन्जी पत्तेच झाल की...जुगारच..."
"अहो नाही हो..खरच जुगार नव्हतो खेळत..."
"नाव काय ?"
"जोशी"
"कुठ रहातो ?"
"शनिवार पेठ"
"वडिल काय करतात ?"
"मोठ्या company मधे manager आहेत.."
"म्हन्जे सगळच जमुन आलय की राव !!.."
"अहो खरच जुगार नव्ह्तो खेळत ...साधा पत्त्यासारखा खेळ आहे.."
"चांगल्या घरातली मुल तुम्ही...कमवणारी...घरी बसायच संध्याकाळच ते सोडुन हे कसले धंदे करता..आमच्याकडे तक्रार आलीय आजुबाजुच्या लोकांची की रोज इथे जुगार चालतो म्हणुन.."

आता खर म्हणजे हेही एक आश्चर्य होत. नागरिकांनी पोलिसांना फोन करण...पोलिसांनी त्याची दखल घेण...पोलिस घटनास्थळी पोहोचण...तिही घटना घडत असताना आणी 'संशयितांना' 'मुद्देमालासकट' ताब्यात घेण.हे सगळच अविश्वसनीय होत. पण हे सगळ घडल होत. शेवटी मार्केटयार्डाच्या मागच्या भागात जीप थांबली. पोलिस जातीवर उतरला. "बोला ...काय करायच आता ?"हा अस्सल पोलिसी प्रश्न ऐकुन भाऊंला धीर आल. यासारख्या काही प्रसंगांचा त्याला अनुभव होता. मागे एकदा गोवा trip हुन परत येताना महाराष्ट्र सीमेवर विनाकारण गाडी अडवण्यात आली असताना 'direct CID मधल्या ' माणसाला फोन लावुन त्यानी गाडी सोडवली होती. त्यामुळे pant सावरत तोंडावरुन हात फिरवत पुढे होऊन त्यानी सुरवात केली.."जाऊ द्या ना साहेब..सोडुन द्या...जुगार नव्हतो खेळत...परत नही खेळणार...ते हे आपल्या ओळखीचे आहेत.." शेवटी हो नाही करता करता काही रकमेवर मांडवली झाली. रोख रक्कम वसुल करुन पोलिसांनी 'खेळाडुंना' मार्केटयार्डाच्या मागच्या गल्लीत सोडुन दिल. आपल्या गाड्या तिथुन खुप लांब असल्यामुळे आधी फरार झालेल्या MBBS doctor ला फोन लावला.तो car घेऊन आला. सगळ्यांना गाड्यांपाशी सोडल आणी मध्यरात्रीनंतर या नाटकाची सांगता झाली.
या घटनेनंतर हल्ली लोक fergusson college समोरच्या अंधार्या 'सवेरा' मधे चोरुन भेटतात आणी CCD, UNO, पत्ते, असे शब्द कानावर पडले की, 'त्या रात्री त्या पोलिसानी खरच 'आत' घेतल असत आणी तिर्थरुपांना जुगाराच्या आरोपाखाली आत गेलेल्या आपल्या मुलाला सोडवायला याव लागल असत तर काय महाभारत झाल असत' या विचारानी दोन मिनिट शांतता पसरते.

4 comments:

Unknown said...

sahi jhalaya lekh..

बोलघेवडा said...

lai bhari. 1 number. Bhaucha varnan avadala.

Maithili said...

Sahiye... :D

सौरभ said...

Hey guys,
thanks much for reading my post. Please do read my other posts also.

-Saurabh