Saturday, October 25, 2008

भरकणारे विचार


निष्ठा... त्याग....समाजसुधारणा....वचनबध्द्ता.......जुनाट, गंजलेले, फाटुन जीर्ण झालेले शब्द...
चारचौघात उच्चारले तर कुत्सित हास्यानी स्विकारले जातील...किंवा विचित्र नजरांनी....

माझ्या देशाच्या इतिहासातील मला पटलेल्या या तीन गोष्टी...गोष्टी ? माझे मोडकेतोडके विचारच म्हणा ना....चुकीचे की बरोबर ? मला माहित नाही. ....कारण छोट्या शाळेत शिकविलेल्या, 'चुक कि बरोबर ?' प्रश्नात सोडवलेल्या या संज्ञांचे अर्थ आज शोधताना मेंदुची प्रत्येक पेशीन पेशी ताणली गेल्याचा भास होतो...

एक

काळ - अतिप्राचीन
स्थळ - महर्षी व्यासांच महाभारत
व्यक्ती - कर्ण

महाभारत म्हणजे व्यक्तीरेखांच कोलाज॑॑ ....पण अर्थपुर्ण...विषयगर्भ...एकमेकांत गुंतलेल्या असंख्य बर्यावाईट व्यक्तीरेखा...या सगळ्यांना छेद देऊन जाणारी...त्या अद्वितीय महाकाव्याला व्यापणारी व्यक्तीरेखा..कर्ण.
कुमारीमातेला त्याही काळात समाजात स्थान नव्हत. म्हणुन कुंतीनी स्वतःच्या हातांनी नदीत सोडलेल कर्ण. प्रत्यक्ष सुर्यपुत्र. सारथ्याच्या घरी वाढलेला. स्वसामर्थानी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालेला. कवचकुंडलधारी राधेय. दुर्योधनानी राजकीय स्वार्थासाठी त्याला राजमुकुट चढवला. प्रतिष्ठा दिली. आणि कर्ण दुर्योधनाचा झाला. सर्वश्रेष्ठ दानवीर ...त्या असीम तेजाचा अंश असलेल्या त्या महारथ्याला दुर्योधनाचा स्वार्थ कळला नसेल काय ?पण एकदा दुर्योधनाला दिलेला शब्द त्यानी कधीही मागे घेतला नाही. श्रीकृष्णानी त्याला त्याच जीवनरहस्य सांगितल्यावरही. कुंतीनी आवाहन करुनही. शेवट पर्यंत तो दुर्योधनासाठी लढला. आणि विझला. विझला ? खरच अर्जुनानी त्याचा वध केला ? का त्यानेच स्वतःच जीवन संपवल ? कवचकुंडल इंद्राला देउन ? का दिली त्याने कवचकुंडल ? सुर्यदेवांनी, त्याच्या पित्यानी, स्वप्नात येउन सांगितल असतानाही . त्याग म्हणुन ? सर्वश्रेष्ठ दानवीर व्हायच होत म्हणुन ? नाही कदाचीत. तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता हे त्याला माहित होत म्हणुन. कवच कुंडलहीन, कुंतीच्या वचनाने बध्द, ब्राम्हणानी शापलेला, परशुरामानी धिक्कारलेला कर्ण अजिंक्यच होता. त्याच प्राणप्रिय 'विजय' नावाच धनुष्य हातात असताना तो वधला जाण शक्य नाही हे माहित असल्यानीच श्रीकृष्णानी अर्जुनाला तो बाण मारायला प्रवृत्त केल. आणि आपण जगलेल आयुष्य, जपलेली मुल्य सिध्द करण्यासाठी त्या सुर्यपुत्रानी तो स्विकारला....अर्जुनाला आपल्या प्राणांच शेवटच दान देउन॑ !!!.

दोन

काळ - ख्रिस्तापुर्वीचा भारत.
स्थळ - मगध
व्यक्ती - आचार्य चाणक्य

जिच्याबद्दल इतिहासाला जवळपास काहिच माहित नाही, पण जिने देशाचा इतिहासच बदलला, अशी व्यक्ती म्हणजे चाणक्य. धनानंदाच्या मगधात कुठेतरी जन्माला आलेला विष्णु नावाचा मुलगा. धनानंदाच्या कोठडीत वडिलांचा मृत्यु झाल्यावर तक्षशीलेत पोचला. स्वतःच्या अफाट बुध्दीमत्तेच्या जोरावर अनेक विषयांचा अभ्यास करुन आचार्य चाणक्य झाला. आणि त्याच वेळी विश्वविजयाला निघालेला ग्रीसचा अलेक्झांडर भारताच्या दारात येउन उभा राहिला. तक्षशीलेच्या अंभीराजाने तत्परतेने त्याच्याशी संधी करुन त्याला आत घेतला. मगधाच्या धनानंदाकडे मदत मागायला गेलेल्या चाण्यक्याला त्यानी धक्के मारुन बाहेर काढल. चाणक्याची शिखा सुटली. राज्यकर्त्यांच्या बेपर्वाने आणि मदांधतेने संतप्त झालेल्या त्या ब्राम्हणानी प्रतिज्ञा केली...धनानंदाला संपवीन....भारत यवनांच्या ताब्यातुन मुक्त करीन..मगच शिखा बांधीन...आणि मग सुरु झाला थक्क करणारा चाणक्याच्या बुध्दीमत्तेचा खेळ. स्वाभिमान विसरलेल्या, निती-अनितीच्या वेड्या कल्पनांनी जखडलेल्या समाजाला आचार्यानी व्यवहार शिकविला. साम, दाम, दंड, भेदाचा वापर शिकविला. एक माणुस, बलाढ्य, प्रचंड शक्तिशाली पण भ्रष्ट मदांध सत्ता बुध्दीच्या जोरावर खाली आणु शकतो हे दाखवुन दिल. रानात फिरण्यार्या चंद्रगुप्ताचा सम्राट चंद्रगुप्त झाला. यातुन जे साम्राज्य निर्माण झाल ते पुढील ४०० वर्ष टिकल.
या सगळ्या खेळात दोन व्यक्तींची कहाणी बघण्यासारखी आहे. एक चाण्याक्यइकाच प्रसिध्द - मगधाचा महामंत्री, अमात्यराक्षस, दुसरा - काळाच्या ओघात हरवलेला मगधाचा सेनापती - धवलगिरी. मगधाच्या सेनापतीनी चाणक्याच्या जाळ्यात अडकुन नंदाशी विश्वासघात केला. चंद्रगुप्ताच्या सेनापतीपदाच गाजर दाखवुन आचार्यंनी त्याला मगधाविरुध्द जाण्यास भाग पाडल. मगधाच्या पाडावानंतर त्यालाच विश्वासघाती म्हणुन घोषित केल. आचार्यांच्या या चालीनी हतबल झालेला सेनापती आचार्यांना विचारतो - माझ्याबरोबर हा विश्वासघात का ? यावर आचार्य उत्तर देतात - " तु सेनापतीपदासाठी नंदाचा विश्वासघात केलास. चंद्रगुप्ताबरोबर तु एकनिष्ठ राहशील याची खात्री काय ? मगधाच्या विश्वासघात्यांबरोबर विश्वासघात चुक आहे काय ? "
याउलट अमात्यराक्षस. शेवटपर्यंत नंदाशी एकनिष्ठ राहिला. नंद चुक आहे हे माहित असुन. मगधाच्या हितासाठी. चाणक्याबरोबर बुध्दीबळाचा खेळ जीव तोडुन खेळला. चंद्र्गुप्ताला संपवण्याचे आणि नंदाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न आपली सर्व शक्ती पणाला लावुन केले. याच निष्ठेसाठी चाण्यक्यानी त्याला चंद्र्गुप्ताचा महामंत्री होण्याच आवाहन केल. स्वतःला बाजुला ठेउन .....निस्वार्थपणे...!!

तीन

काळ - १९३०
स्थळ - १९३० सालातले अत्यंत कर्मठ पुणे.
व्यक्ती - रघुनाथ कर्वे

१९३०. स्वातंत्रलढ्यानी भारलेला काळ. पहिल्या युध्दातुन सावरलेला समाज. धर्म, रुढी, परंपरा यांचा जबरदस्त पगडा असलेल पुण. धोंडो केशव कर्वांना स्त्रिशिक्षणासाठी, विधवाविवाहासाठी वाळीत टाकणार. स्त्रिशिक्षण, विधवाविवाह, स्त्रिस्वातंत्र यासारख्या शब्दांनी दचकणारी माणस आणि धर्म बुडाला अशी ओरड करणारे ब्राम्हण. अशा काळात आणि कर्वे कुटुंबच्या वातावरणात वाढलेल्या रघुनाथ कर्वांनी समाजाच्या एक अतिशय नाजुक आणि जटिल प्रश्नाला हात घातला. संततीनियमन. स्वतः डॉक्टर होउन, परदेशातुन संततीनियमनाची साधन आणुन या पुण्यात त्याच्या प्रसाराला सुरवात केली. पत्नीला त्याच शिक्षण दिल. ही साधन, त्याचे उपयोग, स्त्रीपुरुषांची शरीररचना, समागम या विषयी शास्त्रीय लिखाण केल. या विषयावरच पहिल नियतकालीक चालवल. स्त्रीशिक्षणासारख्या साध्या गोष्टीबद्द्लच अनस्था असणार्या त्या समाजाला या संकल्पना म्हणजे जबरदस्त धक्का होता. रघुनाथ कर्वांचा आवाज त्याकाळी कोणापर्यंतच पोचु शकला नाही. वाढती लोकसंख्या हा एक प्रश्न आहे किंवा होणार आहे हे त्या द्रष्टया माणसानी १९३० सालात ओळखल होत हे पहिल की थक्क व्हायला होत. पण स्वातंत्र्योत्तर काळातही याची कोणी दखल घेतली नाही. पत्नीच्या मृत्युनंतर अंतिमसंस्कारासाठी एकही माणुस पुढे आला नाही इतक दुर्दैव.
पण आज तरी आपण त्यांच ऐकतो आहोत का ? २०२० साली भारत जागतीक महासत्ता होइल न होइल पण तो निश्चित लोकसंखीय महासत्ता बनणार आहे. २०२० साली जगात सर्वाधीक लोक भारतात रहातील. भारतात ? की गरिबीत ? दहशदीखाली ? आजच्या आपल्या सर्व समस्यांच मुळ लोकसंख्येच्या विस्फोटामधे आहे हे आपण कधी समजुन घेणार ? हाताला काम आणि पोटाला अन्न नसणारी माथी लवकर भडकतात. हवी तशी वळवता येतात. भ्रष्टाचारानी पोखरलेली राजकीय, शासकीय, कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा किती दिवस उभी राहु शकेल ? जी विविधता आजपर्यंत आश्चर्यकाररित्या एक राहिली ती यापुढे एक राहिल का ? इतिहास हे चुक की बरोबर पडताळुन पहाण्याच पुस्तक नाही का ? यावर उपाय ?????
हे विचार कधी थांबतील अस वाटत नाही. सध्या आजुबाजुला घडणारी प्रत्येक घटना, अनुभव, शिक्षण, वाचन परत परत विचारांची फटाक्यांच्या लडीसारखी माळ सुरु करत........उपाय शोधत रहात.......दहशदवादावरचे.......भ्रष्टाचारावरचे .....राजकीय निर्लज्जपणावरचे............

आस्तिक असतो तर देवाकडे कळकळीची प्रार्थना केली असती आणि शांत झोपलो असतो.

...........नसलेल्या देवाला आणि असलेल्या नियतीला,
कर्णाची वचनांसाठी जगण्याची आणि मुल्यासाठी मरण्याची वृत्ती दे...
चाणक्याची भ्रष्ट यंत्रणेला उलथुन टाकणारी बुध्दी आणि हट्ट दे....
रघुनाथ कर्वांच द्रष्टेपण दे....

No comments: