Saturday, October 25, 2008

पत्रिका


आमचा एक मित्र आहे. तसे आमचे अनेक मित्र आहेत. पण ते नुसतेच आहेत.काही लोकांच्या दर्शनानी आपल डोळे दिपुन जातात (आणि कान बंद करुन घ्यायची सोय देवानी का केली नाही असा प्रश्न मिनिटा मिनिटाला पडतो..)अश्या लोकांपैकी हा आमचा मित्र आहे.आपण नाव नको घेउयात. मी म्हणतो नावात काय आहे ? (बरेच लोक हे,कोणीएक शेक्सपियर की काय त्याच वाक्य आहे अस सांगतात. तिकडे लक्ष देऊ नये.)आडनाव जोशी आहे अस धरुयात.( धरुयात, म्हणजे आहेच...पण इतके जोशी आहेत की, रस्तामधे चालताना जर दहा माणस पाय घसरुन खड़्यात पडली, तर त्याच्यात सहा जोशी असतात अस आमच संशोधन सांगत...म्हणुन धरुयात म्हटल की प्रत्येक जोश्याला वाटणार दुसर्या बद्दल बोलतोय..)तर कल्पना अशी करतोय की या जोश्याच लग्न ठरल. जे ह्याला ओळखतात त्यांना ही कल्पना भयंकर वाटेल. पण कल्पना करायची तर जबरदस्त करायची. कोणी म्ह्टल कि "समजा तुम्ही गोडाच जेवत आहात", तर एकदम पानात शिकरण आहे. अशी कल्पना नाही करायची. याच लग्न ठरल तर पत्रिका कशी असेल ? याला त्रास नको म्हणुन आम्हीच पत्रिका लिहित आहोत.

श्री धीरुभाई अंबानी प्रसन्न

आमचे येथे श्रीकृपेवरुन आमचे सुपुत्र, हरिभक्तपरायण, थोर विचारवंत, मितभाषी चि. --- जोशी आणी चि. सौ. कां. कोणीतरी यांचा विवाह निश्चित करण्यात आला आहे. तरी विवाहसमारंभ घरगुती स्वरुपाचा असल्यामुळे, त्यानंतर होणार्या पानसुपारी कार्येक्रमास उपस्थित रहावे.

कृपया पुष्पगुच्छ आणु नयेत.

काही सुचना,

१. आयत्या वेळी जर नवरा मुलगा " बघु नंतर, काय घाई आहे ? " (हे जनात ...)(क्या करना है ? गटर फुंकनेकोही जाना है ना ? हे मनात..) म्हणाला आणि लग्नसमारंभ होउ शकला नाही तर जोशी कुटुंबीय जबाबदार रहाणार नाहीत.

२. आपण उपस्थित राहु शकणार नसाल तर कृपया आगाऊ कळवावे. त्याप्रमाणे पान आणि सुपार्यांची खरेदी करता येईल.

३. साधी रहाणी ( आणि फाटकी विचारसरणी....) असे नवर्यामुलाचे उच्च विचार असल्यामुळे लग्न समारंभ "35 शुक्रवार " या पत्त्यावरील वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील डावीकडील अंधार्या खोलीत संपन्न होईल.

४. "आयुर्वेदीय भांडार" हे तळमजल्यावरील दुकान सकाळी ८.३० वाजता उघडण्याला ७५ वर्षांची परंपरा असल्यामुळे लग्न समारंभ ८.३० च्या आत संपेल आणि नवरा मुलगा व मुलगी दुकानात आहेर स्विकारण्यासाठी व (पाहिजे असल्यास) पानसुपारी देण्यासाठी उभे रहातील.

५. चेक, सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्डस स्विकारण्याची सोय केली आहे.

६. आहेर म्हणुन शेर्यस दिल्यास पहिल्या मजल्यावर जेवण मिळेल.

७. गेली ७५ वर्ष दुपारी १२ ते ४ दुकान बंद ठेवण्याची प्रथा असल्यामुळे १२ वाजता नवरा मुलगा व मुलगी दुकान बंद करुन वर जातील. मग जेवण आणि (आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ) २ तास वामकुक्षी असा भरगच्च कार्येक्रम आहे.

८. दररोज संध्याकाळी 'युवाशक्ती' या गिर्यारोहण संस्थेच्या विनामुल्य सेवेसाठी जाण्याचा नवर्यामुलाचा शिरस्ता असल्यामुळे "35 शुक्रवार" ते "४३० नारायण " अशी नवीन जोडप्याची पदयात्रा आम्ही निश्चीत केली आहे. यामुळे नव्या नवरीला शुक्रवार, शनिवार, नारायण या पेठा आणि नागनाथपार, शनीचा पार, हमालवाडा या नयनरम्य परिसराच दर्शन घडेल.

९. पुढील वर्षी मे महिन्यामधे नवरा मुलगा 'युवाशक्ती' या गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहण मोहिमेवर गटप्रमुख म्हणुन (फुकट) जाईल त्याठिकाणी १५ दिवस मधुचंद्राची व्यवस्था केली आहे.

आम्ही नवपरिणित जोडप्यासाठी सुखी वैवाहिक जीवनाची कामना करतो आणि नव्या नवरीचे सुयश चिंतीतो.

आपल्या अमुल्य वेळाबद्दल ( जोशी मित्र ) मंडळ आपले आभारी आहे.

आपला नम्र,

1 comment:

Tushar said...

awara!!!!!!!!!!!!!!!!..ek no pandya...........well tyamadhe ek addition ahe....Lagnachya weles mulicha pagar 75000rps naslyas mulila nakar denyat yeil.....yetana tat-wati swataha gheun yave...jevananantar pachan churna fukat denyat yeil...tras zalyas amhi javabdar nahi..:)